गणेशमूर्तींचे रंगकाम अखेरच्या टप्प्यात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : – 
गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने येथील कुंभारवाड्यात गणेशमूर्तींचे रंगकाम, तसेच सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार मूर्तींच्या विविध सजावटी करण्यात कलाकार व्यस्त आहेत. याठिकाणी कराड शहर, तालुका व आसपासच्या तालुक्यातील सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्ती तयार झाल्या असून त्यावर अखेरचा हात मारताना कलाकार दिसत आहेत. 

दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी तरुणाईसह बच्चे कंपनी आणि नागरिक बाजारपेठेत मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, येथील बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी तयार सजावट व आरास साहित्यांची रेलचेल झाली असून विविध आकर्षक विद्युत रोशणाईच्या माळांनी आणि दिव्यांनीही बाजारपेठे उजळून निघाली आहे.

सजावटीसाठी लागणारे मंडप सेट, सजावटीच्या तयार फुलांच्या माळा, गणपतीचे हार, तुरे, ग्रीन मॅट, फ्लावरपॉट, मंदिरे, रांगोळी, रंगीबेरंगी पडदे, फुलांची आणि लोकरीची तोरणे, कागदी पंखे, पूजेचे साहित्य आदी साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक, महिला मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहे.

त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या गणेशमूर्ती स्टॉलवरही आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी आणि मूर्ती ठरवण्यासाठी बालचमू, तरुणाई व नागरिक, त्याचबरोबर लाडक्या गौराईचे मुखवटे पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठीही आत्तापासूनच महिला वर्ग गर्दी करताना दिसून येत आहेत.

तसेच लाडक्या गणपती बाप्पाला रोज दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्यासाठी आत्तापासूनच मिठाईच्या दुकानात नागरिक, महिला गर्दी करू लागल्या असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. शिवाय, गौरी आणि गणपतीच्या प्रसादासाठी लागणारे बेकारीतील विविध खाद्यपदार्थ, फळे, भडंग, मेवा, मिठाई, त्याचबरोबर पिजेसाठी लागणारे अगरबत्ती, कापूर, वात, धूप आणि सजावटीसाठी आवश्यक रांगोळी खरेदीसाठीही नागरिक, महिलांची गर्दी होताना दिसून यात आहे.

एकूणच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात अबलवृद्धांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!