झाकीर पठाण यांचे सत्ताधारी-विरोधकांना आव्हान; फ्लेक्स बोर्डचा ठराव बदलल्याचाही आरोप
कराड/प्रतिनिधी : –
नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील, तर केवळ आरोप-प्रत्यारोप न करता पालिकेनेच सर्व कथित गैरव्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करण्याचा ठराव घ्यावा, असे थेट आव्हान काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे झाकीर पठाण यांनी दिले. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत बाराडबरी येथे गार्डन उभारल्याचे कागदोपत्री दाखविले; मात्र प्रत्यक्षात गार्डनच अस्तित्वात नसल्याचा आरोप करत त्यांनी ‘कराडमधील गार्डन गेले चोरीला!’ अशी उपरोधिक टीकाही केली.
पत्रकार परिषद : शासकीय विश्रामगृहात काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमित जाधव, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे उपस्थित होते.
सव्वा कोटींचे गार्डन गेले चोरीला : बाराडबरी येथील गार्डनच्या कामात सुमारे एक कोटी आठ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पठाण यांनी केला. सीएसआर निधीतून झाडे लावण्यात आली असतील; मात्र ‘माझी वसुंधरा’ अभियानातून स्वतंत्र गार्डन उभारल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असून, प्रत्यक्षात तेथे गार्डन दिसत नसून, ते चोरीला गेले की काय, अशी टिपण्णी करत या कामाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा : सोलर पॅनलच्या कामातही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पठाण यांनी केली. पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असतील, तर त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवावी. त्यासाठी पालिकेने सर्व प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी करण्याचा ठराव घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
फ्लेक्सच्या नियमात बदल केल्याचा आरोप : शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी फ्लेक्स बोर्डवर बंदी असताना माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नियमात बदल करण्यात आल्याचा आरोपही पठाण यांनी केला. परवानगीपेक्षा मोठे फ्लेक्स लावले जात असून, परवानगीची मुदत संपल्यानंतरही ते हटविले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेकडे किती अर्ज आले, याची माहिती मागितली असता अर्जच प्राप्त झाले नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले, असा दावा पठाण यांनी केला. नियमबाह्य फ्लेक्सप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत त्यांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला. शहरातील मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली.
संविधान भवन, उर्दू शाळेच्या प्रस्तावावर आक्षेप : वाढीव भागातील संविधान भवन व उर्दू शाळेच्या प्रस्तावावरही पठाण यांनी आक्षेप घेतला. घनकचरा प्रकल्पाजवळ शाळा उभारल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
श्रेयवादातून नागरिक वेठीस : शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विकास करण्यासाठी निवडून दिले आहे. परंतु, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या श्रेयवाद सुरू असून, नागरिकांना वेठीस धरले जात आहे. ३०० कोटींच्या निधीची केवळ फ्लेक्सबाजी झाली, मात्र प्रत्यक्षात कामे झाली नसून नागरिकांच्या मूलभूत विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केला. शिवाजी स्टेडियमचे नूतनीकरण सुरू असल्याने खेळाडूंना सरावासाठी पर्यायी मैदान उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
गोरगरिबांवर कारवाई; धनदांडग्यांना अभय : बैल बाजार रोडच्या दुरवस्थेवरून संतापशहरातील बैल बाजार रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड.अमित जाधव यांनी सांगितले. पालिकेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहत असून, गोरगरिबांवर कारवाई करताना धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्य जनतेसमोर आणावे : पालिकेने विकासकामांबाबत पारदर्शकता ठेवून नागरिकांसमोर कामांचा लेखाजोखा मांडावा. आरोप-प्रत्यारोपांऐवजी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.