पृथ्वीराज चव्हाण; अनेक साहित्यकृतींमधून समृद्ध केले मराठी साहित्य, कराडच्या साहित्यिक परंपरेचा अभिमान हरपल्याची भावना
कराड/प्रतिनिधी : –
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र शासनाच्या ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे’ मानकरी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र शोक व्यक्त करत मराठी साहित्यविश्वातील एक अभ्यासू, संवेदनशील आणि मूल्यनिष्ठ लेखक हरपल्याची भावना व्यक्त केली आहे.
शोकसंदेश : प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात चव्हाण यांनी म्हटले आहे की, श्रीनिवास कुलकर्णी यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीमुळे मराठी साहित्यात स्वतंत्र स्थान निर्माण केले ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’, ‘डोह’ आणि ‘सोन्याचा पिंपळ’ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी जीवनातील सूक्ष्म अनुभव, निसर्गातील बारकावे आणि मानवी भावविश्व प्रभावीपणे शब्दबद्ध केले. चित्रकलेचा प्रभाव, निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण आणि पारदर्शी लेखनशैली यांमुळे त्यांच्या साहित्याला वेगळी ओळख मिळाली.
पुरस्कार : ललित लेखनाला नवे परिमाण देणाऱ्या लेखकांमध्ये श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे साहित्य मराठीबरोबरच कानडी, बंगाली आणि इंग्रजी भाषांमध्येही पोहोचले. महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्यरत्न पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ हा त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेचा योग्य सन्मान असल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
अभिमान : कराडच्या साहित्यिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या श्रीनिवास कुलकर्णी यांच्या कार्याचा समस्त कराडकरांना कायम अभिमान राहील, असे सांगत त्यांच्या निधनाने साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.
श्रद्धांजली : कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत, दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख पेलण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली.