कापील, गोळेश्वरमध्ये बोगस मतदार, मतदानाचा हक्कही बजावला

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

गणेश पवार यांचा पुराव्यासह खुलासा; गुन्हे दाखल न केल्यास 14 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

कराड/प्रतिनिधी : –

कापिल आणि गोळेश्वर या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांच्या मतदार याद्यांमध्ये बोगस नावे समाविष्ट केल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार यांनी केला आहे. तसेच याबाबतच्या अनेक पुराव्यासह हा प्रकार त्यांनी उघडकीस आणला आहे.

फौजदारी गुन्हे दाखल करा : बोगस मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, मतदार नोंदणी करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर 14 ऑगस्टपासून कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही गणेश पवार यांनी दिला आहे.

पत्रकार परिषद : येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रहिवाशी नसताना मतदार यादीत नावे कशी : प्रियांका श्रीकांत चव्हाण, रूथ माईकल काळे, स्वाती सुनील मोरे, शितल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनीता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील या व्यक्ती कापिल गावच्या रहिवाशी नसताना यांची नावे कापिलच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याचे श्री. पवारांनी सांगितले.

अचानक हे मतदार आले कुठून? : या मतदारांनी यापूर्वी ग्रामपंचायत, लोकसभा अथवा अन्य निवडणुकांमध्ये मतदान केलेले नाही. गावात त्यांचे घर, जमीन नाही. ते गावचे रहिवाशीही नाहीत. असे असताना अचानक हे मतदार आले कुठून? असा सवाल श्री. पवार यांनी उपस्थित केला.

महसूल विभागाकडून पंचनामा : महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनीही तसा पंचनामा केला असून, या मतदारांची नावे मतदार यादीत कशी समाविष्ट झाली याबाबत काही ठोस पुरावे आढळून येत नसल्याचे मंडल अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे.

दोन्ही गावात नावे : विनोद मोहन कदम आणि शिवम मोहन कदम यांची नावे कापिल व गोळेश्वर या दोन्ही गावात आढळून आली आहेत. तृप्ती उमेश गुणे या महिला मतदाराचे नाव कोल्हापूरचा पत्ता असणार्‍या आधार कार्डच्या आधारे कापिल गावी नोंदवले गेले आहे. त्यांचाही गावात रहिवास नाही.

गोळेश्वरमध्ये 75 बोगस मतदान : आधार कार्डवर पत्ताच नाही, असे गोळेश्वर येथे 75 मतदार आढळून आले आहेत. या प्रकरणांची चौकशी करावी. या व्यक्ती कापिल व गोळेश्वरमध्ये रहिवाशी नसताना त्यांची नावे मतदार यादीत कशाच्या आधारे लावली गेली? कोणी लावली? याचीही चौकशी व्हावी. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गणेश पवार यांनी केली आहे.

बेमुदत उपोषण : कारवाई न केल्यास 14 ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!