सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड अर्बन बँकेच्या प्रगतीमागे असलेल्या नेतृत्वाची देशपातळीवर दखल

कराड/प्रतिनिधी : –

सहकार क्षेत्रात दूरदृष्टीपूर्ण कार्य करून कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला उच्च शिखरावर नेणारे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. इंडियन स्टार्टअप टाईम्स या डिजिटल माध्यमातर्फे हा पुरस्कार देण्यात आला असून, सहकार चळवळीत त्यांच्या मोलाच्या योगदानाची ही देशपातळीवर झालेली मान्यता आहे.

व्यवसाय आणि सदस्यसंख्येत वाढ : श्री. गुरव हे सध्या ‘अर्बन’ कुटुंबाचे सल्लागार म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यकाळात कराड अर्बन बँकेच्या व्यवसायात आणि सदस्यसंख्येत मोठी वाढ झाली. 2004-05 मध्ये बँकेचा व्यवसाय सुमारे 660 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होता. तो 2024-25 या आर्थिक वर्षअखेर 5837 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात गुरव यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. याच काळात सभासदांची संख्या 25 हजारांवरून 90 हजारांवर पोहोचली.

आधुनिक सेवा : श्री. गुरव यांच्या नेतृत्वात बँकेने डिजिटल परिवर्तनाची दिशा घेत संगणकीकरण, कोअर बँकिंग सिस्टीम, एटीएम, युपीआय व मोबाईल बँकिंगसारख्या आधुनिक सेवा सुरू केल्या. बँकेच्या या उल्लेखनीय कामगिरीस विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले असून, ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कारानेही बँकेला गौरवण्यात आले आहे.

बँकांचे यशस्वी विलीनीकरण : श्री पार्श्वनाथ सहकारी बँक, अजिंक्यतारा सहकारी बँक आणि अजिंक्यतारा महिला सहकारी बँक यांचे यशस्वी विलीनीकरण करून बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात गुरव यांनी मोलाचा वाटा उचलला. सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी त्यांनी नेहमीच नव्या संधी शोधत व्यापक दृष्टिकोन बाळगला. ग्रामीण व शहरी भागांतील ग्राहकांना सुलभ सेवा देणे, जबाबदारीने कर्जपुरवठा करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि सेवा जलद व अचूक ठेवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले.

अभिनंदन : या पुरस्कारप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे, तसेच संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद व ग्राहकांनी सीए दिलीप गुरव यांचे अभिनंदन केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!