सुनिलबापू लाड; गुरुपौर्णिमेनिमित्त शिवप्रतिष्ठानतर्फे शिवशंभू छत्रपती विषयावर व्याख्यान; गडकोट मोहिम, दुर्गामाता दौड, विवेकसभेचे महत्त्व अधोरेखित
कराड/प्रतिनिधी : –
“शिष्याच्या अंतःकरणात स्वत्व जागवणारा गुरूच खरा सद्गुरू असतो. शिवरायांच्या जीवनात ही शिकवण राष्ट्रनिर्मितीचे अधिष्ठान ठरली. छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानातून देशासाठी कसे मरावे, हे आपणास शिकायला मिळाले. आजही संभाजी भिडे गुरुजी या आदर्शांचे जतन करून तरुणांमध्ये देव, देश, धर्म आणि राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा देत आहेत,” त्यानुसार शिवशंभू छत्रपतींनी सांगितलेल्या सद्गुणांच्या आधारावर युवकांना राष्ट्र उभारणीचे व्रत घ्यावे लागेल,” असे स्फूर्तीदायी विचार ज्येष्ठ धारकरी व कीर्तनकार सुनिलबापू लाड यांनी व्यक्त केले.
व्याख्यान : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्तान कराड-पाटण विभागाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक के. एन. देसाई होते, तर खंडाळे काका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवशंभू छत्रपतींना गुरूपरंपरेची शिकवण : “शिवराय हे केवळ राजे नव्हते, तर ते राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेली नीती, धर्म आणि शौर्य यांचे मूर्तिमंत रूप होते,” असे सांगताना सुनिलबापू लाड म्हणाले, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ आणि त्यांच्याच प्रेरणेतून घडलेले संभाजीराजे यांचे कार्य व जीवनमूल्य उलगडून दाखवले. “प्रभू श्रीराम वशिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनात घडले; अर्जुनाने श्रीकृष्णाच्या उपदेशाने धर्मपराक्रम केला; तसेच शिवशंभू छत्रपतींना त्यांच्या गुरूपरंपरेची शिकवण लाभली. ही शिकवणच त्यांच्या राष्ट्रनिर्मितीमागे असलेली आत्मिक शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
भिडे गुरुजी सद्गुरू परंपरेतील मार्गदर्शक : “आई-वडील, शिक्षक हे गुरु होतच, पण जे तुमच्या आत्म्याशी नाते जोडतात, विवेक जागवतात, तेच खरे सद्गुरू असतात. भिडे गुरुजी अशाच सद्गुरू परंपरेतील मार्गदर्शक आहेत, असे सांगत श्री. लाड म्हणाले, गुरुजींनी शिवरायांच्या विचारांची सजीव पुनरावृत्ती केली आहे. शिक्षणावर केवळ चरितार्थ चालतो, पण राष्ट्रासाठी जगण्याचे तत्त्वज्ञान हे शिवशंभूंकडून मिळते,” असे गुरुजी सांगतात.
विवेकसभांची गावोगावी पुनर्रचना : “गडकोट मोहिम म्हणजे राष्ट्रभक्त युवक तयार करणारी कार्यशाळा आहे. तर दुर्गामाता दौड भक्ती म्हणजे काय, हे शिकवते. शिवरायांनी रायगडावर घेतलेल्या विवेकसभेची संकल्पना भिडे गुरुजींनी आपल्या मनात जागवली. अशा विवेकसभांची गावोगावी पुनर्रचना झाली पाहिजे.”, असे श्री. लाड यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक दिनच खरा स्वातंत्र्यदिन : “शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून परकीय सत्तांचा बंदोबस्त केला नसता, तर आजही आपण गुलामगिरीत असतो. त्यामुळे रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन हाच खरा स्वातंत्र्यदिन मानला पाहिजे,” असे श्री. लाड यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपात रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापनेसाठी चालू असलेल्या मोहिमेचा उल्लेख करत “कराड-पाटण विभागाने या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढाकार घ्यावा. हीच खरी शिवभक्ती आणि गुरुसेवा ठरेल.” असे आवाहन श्री. लाड यांनी केले.
हीच खरी गुरुदक्षिणा : कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा कार्यवाह सागर आमले यांनी “छत्रपतींच्या विचारांनी युवक घडवण्याच्या गुरुजींच्या कार्यात सहभागी होणे, हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचे सांगितले.” यावेळी कराड-पाटण विभागातील धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गड-किल्ल्यांआधी ताजमहाल युनेस्कोच्या यादीत का?”
“महाराष्ट्राला शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या शेकडो गड-किल्ल्यांचा तेजोमय इतिहास आहे. तरीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ताजमहाल प्रथम येतो, हे दुर्दैव नव्हे का? हा प्रश्न आपल्याला कधीच का पडत नाही?” असा रोखठोक सवाल सुनिलबापू लाड यांनी उपस्थित केला.
इतिहासाच्या विकृतीविरुद्ध संतप्त आवाज
“एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये शिवरायांचा उल्लेख केवळ २५ शब्दांत होतो, तर जगातील ५५ देशांमध्ये पदवी शिक्षणात त्यांचा इतिहास सक्तीने शिकवला जातो. आपल्या देशात मात्र जाज्वल्य इतिहास लपवण्याचा प्रयत्न झाला. आपल्या इतिहासाबद्दलची ही उदासीनता चीड आणणारी आहे,” असे सुनिलबापू लाड यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले.
“संस्कार संपले की, जीवन बोथट होते,”
आजघडीला घरोघरी शुभंकरोती म्हणणारे कमी झाले, गोमातेचे पालन लुप्त होत चालले. मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवले जाते, पण ऋषीमुनींच्या संस्कृतीचे भान राहिलेले नाही. त्यामुळे घराघरात अनारोग्य आणि तणाव वाढत आहेत. “संस्कार संपले की, जीवन बोथट होते,” असे निरीक्षणही सुनिलबापू लाड यांनी नोंदवले.
