कराड/प्रतिनिधी : –
रोटरी क्लब ऑफ कराडचा 69 वा पदग्रहण सोहळा शनिवार (दि. 5) रोजी कराड येथील अर्बन शताब्दी हॉल येथे मोठ्या उत्साहत पार पडला. नूतन प्रेसिडेंट डॉ. शेखर कोगनुळकर आणि नूतन सेक्रेटरी विनायक राऊत आणि त्यांचे संचालक मंडळ, तसेच रोटरीतील तरुणांचे संघटन असणारे रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचे नूतन प्रेसिडेंट प्रथमेश कांबळे, नूतन सेक्रेटरी मिहिका देसाई व त्यांचे संचालक मंडळ यांनी या सोहळ्यात पदभार स्विकारला.
पदभार सुपूर्द : रोटरीच्या प्रथेप्रमाणे मावळते प्रेसिडेंट व सेक्रेटरी अनुक्रमे रामचंद्र लाखोले व आनंदा थोरात यांनी कॉलर व चार्टर प्रदान करून नवीन प्रेसिडेंट व सेक्रेटरी यांच्याकडे क्लबचा पदभार सुपूर्द केला. सर्व संचालक मंडळाचे रोटरी पिन व फुल देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मावळते प्रेसिडेंट यांनी मनोगत व्यक्त करत वर्षभराच्या कामाचा आढावा घेत झालेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच नूतन प्रेसिडेंट यांनी त्यांच्या भाषणात आगामी वर्षातील होणाऱ्या उपक्रमांची माहिती देत समाजावर खोलवर सकारात्मक परिणाम करणारे उपक्रम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
निवडीबद्धल सत्कार : रोट्रॅक्ट क्लबचे माजी प्रेसिडेंट अमित भोसले यांची रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या डी. आर. आर. पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला. असि. गव्हर्नर डॉ. नरेंद्र शेलार यांनी त्यांच्या भाषणातून मार्गदर्शनकरीत क्लबच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोटरी 2025-26 या वर्षासाठी कराड क्लबने मानद सदस्य म्हणून कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी सीए दिलीप गुरव, कराड पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिला लाळे यांची निवड करण्यात आली.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची प्रकट मुलाखत : कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भारताचे पहिले पॅरा ऑलिम्पिक विश्वविक्रमवीर सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांची प्रकट मुलाखत सुप्रसिद्ध लेखिका डॉ. सविता मोहिते यांनी घेतली. ज्यामधून त्यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनाची यशोगाथा उलगडण्याचा प्रयत्न केला. त्याला कराडकरांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.
मानपत्र : कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना गीत गाऊन शर्वरी कोगनुळकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अस्मिता फासे, डॉ. रुपाली देसाई व डॉ. भाग्यश्री पाटील यांनी केले. मानपत्र वाचन शिवराज माने यांनी केले. नूतन सेक्रेटरी विनायक राऊत यांनी आभार मानले. मान्यवरांची उपस्थिती : तसेच रोटरी क्लब ऑफ कराडचे सर्व सदस्य व परिवार, विविध राजकीय, सामाजिक, उद्योजक, व्यावसायिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, क्षेत्रातील व्यक्ती व संस्था, विद्यार्थी, विविध लायन्स क्लब्स व एनरव्हील क्लब्स व रोटरी सातारा कॉप्समधील क्लब्सचे पदाधिकारी व सदस्य, भारतीय सैन्यदलातील निवृत्त अधिकारी व नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कराडच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
