पी. डी. पाटील यांच्यासारखा नेता होणे नाही

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

अॅड. मानसिंगराव पाटील; स्व. पी. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी उद्यानात कार्यक्रम 

कराड/प्रतिनिधी : –

कराड तालुक्याचे भाग्यविधाते, सह्याद्री साखर कारखान्याचे संस्थापक, कराड शहराचे शिल्पकार आणि दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेले स्व. पी. डी. पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त ‘गप्पांगण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी उद्यानात करण्यात आले. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, विजय दिवस समारोह समिती, एनव्हायर नेचर क्लब आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

‘गप्पांगण’ विशेष कार्यक्रम : या कार्यक्रमात बोलताना अॅड. मानसिंगराव पाटील म्हणाले, “पी. डी. पाटील यांच्यासारखा नेता होणे नाही”. पी. डी. पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासमूलक कार्याची अॅड. मानसिंगराव पाटील यांनी आठवण करून दिली.

सलग ४२ वर्षे नगराध्यक्षपद भूषवले : वकिलीमध्ये उज्वल कारकीर्द असूनही पाटील साहेबांनी तो व्यवसाय सोडून नगरपरिषद राजकारणात प्रवेश केला आणि सलग ४२ वर्षे नगराध्यक्षपद भूषवले. त्यांनी कार्यकर्त्यांना कधीही दुखावले नाही, चुका झाल्यास राग न करता अप्रत्यक्षपणे जाणीव करून देण्याची शैली होती. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत लोकशाही मूल्ये ठामपणे पाळली जात. नगरपरिषदेतील कोणताही निर्णय सत्ताधारी व विरोधक यांच्यात एकमत झाल्याशिवाय घेतला जात नसे, असेही अॅड. पाटील यांनी सांगितले.

साहेबांसोबतच्या अनुभवांचे कथन : कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत हिंगमिरे यांनी पी. डी. साहेबांसोबत नगरपरिषदेतील अनुभव सांगितले. माजी नगरअभियंता अल्ताफ हुसेन मुल्ला यांनी साहेबांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देताना कराड नगरपरिषद इमारत, अंडरग्राउंड ड्रेनेज, यशवंतराव चव्हाण टाऊन हॉल, टी.पी. स्कीम, शहरातील पुतळे व चव्हाण साहेबांच्या अष्टकोनी समाधीबाबतची माहिती दिली.

पी. डी. पाटील यांचे यशवंतराव चव्हाणांवरील प्रेम : ही समाधी नगरपरिषदेने न बांधता स्वतंत्र “समाधी समिती” स्थापन करून जनतेकडून वर्गणी व देणग्या गोळा करून उभारण्यात आली. रायगडावरील शिवरायांच्या अष्टकोनी समाधीच्या धर्तीवर ही समाधी उभारण्यात आली आणि पी. डी. पाटील यांचे यशवंतराव चव्हाणांवरील प्रेम त्यातून दिसून येते, असेही अल्ताफ हुसेन मुल्ला यांनी सांगितले.

आठवणींना उजाळा : कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. संभाजीराव मोहिते, उद्योजक सुभाष वाडीलाल शहा यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक पाटील, प्राचार्य गणपतराव कणसे यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला. कराडमधील अनेक मान्यवर या गप्पांगण उपक्रमाला उपस्थित होते.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!