आगाशिवनगर येथे आदर्श शाळेचा दिंडी सोहळा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श शिशुविहार व आदर्श प्राथमिक विद्यालय, आगाशिवनगर यांच्यावतीने पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात करण्यात आले.
पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची पूजा : शुक्रवार, दि. ४ रोजी विद्यालयाच्या प्रांगणातून श्री दत्त मंदिर, आगाशिवनगरपर्यंत दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पालकांच्या हस्ते विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची पूजा व श्रीफळ वाढवून झाली. “विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालून निघाला होता.
चिमुकल्याचा विठुरायाच्या चरणी भक्तिभाव : चिमुकल्या वारकऱ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात सहभाग घेत विठुरायाच्या चरणी भक्तिभाव व्यक्त केला. पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय होता.
“माऊली माऊली” गीतावर नृत्याविष्कार : विविध संतांचे पोशाख, अभंग, ओव्या, भजन सादर करत विद्यार्थ्यांनी संत परंपरेचे दर्शन घडवले. “माऊली माऊली” या गीतावर रंगवलेला नृत्याविष्कार प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून गेला.
उद्देश : या उपक्रमाविषयी माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक सचिन शिंदे म्हणाले, “विद्यार्थ्यांना सण-उत्सव, परंपरा, संस्कृती यांची ओळख व्हावी, सामाजिक ऐक्य वाढावे व राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी शाळेमार्फत असे उपक्रम राबवले जातात.”
शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मेहनत : कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्राजक्ता पाटील, सौ. सायराबानू नदाफ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला.
उपक्रमाचे कौतुक : या उपक्रमाचे संस्थेचे सचिव शेतीमित्र मा. अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडूरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, सौ. स्वाती थोरात, संजय थोरात यांनी विशेष कौतुक केले.
