कराडमध्ये शाळांना दिले राज ठाकरे यांचे पत्र
कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) प्रखर विरोधानंतर आणि वाढत्या जनक्षोभामुळे सरकारने या निर्णयामध्ये माघार घेत, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा ऐच्छिक करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरातील सर्व शाळांमध्ये मनसेच्या वतीने हे पत्र प्रत्यक्ष भेट देऊन वितरित करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती : या उपक्रमाचे नेतृत्व मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांनी केले. यावेळी मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, तसेच कार्यकर्ते विलास भोसले, प्रमोद भोसले, हणमंत वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सक्तीचा निर्णय मातृभाषा आणि संस्कृतीवर घाला : सरकारचा हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा महाराष्ट्रातील मातृभाषा आणि संस्कृतीवर घाला घालणारा असून, राज्यातील विद्यार्थ्यांवर परकीय भाषेचा बोजा लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
राज्यव्यापी आंदोलनाची तयारी : या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दर्शवत, सर्व मुख्याध्यापकांना एक परिपत्रक पाठवले आहे. या पत्रामध्ये हिंदी सक्तीच्या धोरणामागील विरोधाभास, शिक्षण स्वातंत्र्याचा भंग आणि मराठी भाषेच्या दुय्यमतेचा धोका यांचा ठाम उल्लेख करण्यात आला आहे. यासंदर्भात आज कराड शहरातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे पत्र प्रत्यक्ष भेट देऊन वितरित करण्यात आले.
पक्षाची भूमिका : पत्र वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनासोबत संवाद साधत, हिंदी भाषा सक्तीविरोधातील पक्षाची भूमिका मांडली.
इशारा : “मराठी ही आमची मातृभाषा असून शिक्षणाचा प्राथमिक टप्पा मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे. शासनाने मराठी भाषेला दुय्यम ठरवण्याचा कोणताही प्रयत्न केला, तर मनसे त्याचा तीव्र विरोध करेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
अस्मितेसाठीचा लढा : राज्य सरकारने यापूर्वीही जनभावनांचा आदर न करता निर्णय घेतल्याचे दाखले देत, मनसेने हा लढा केवळ भाषेचा नसून अस्मितेचा असल्याचे सांगितले. आगामी काळात हा विषय गाजण्याची शक्यता असून, मनसेच्या आगामी आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.
