निसर्ग ग्रुप, कराडचा वृक्षसंवर्धनाचा संकल्प; वृक्षारोपणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक
कराड/प्रतिनिधी : –
जखिणवाडी-मलकापूर (ता. कराड) परिसरातील आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वतीने पक्षीतीर्थ स्थापन करण्यात आले असून, याच परिसरात रविवारी ‘निसर्ग ग्रुप, कराड’ तर्फे विविध देशी वृक्षप्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण : वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत उंबर, करंज, फणस, पिंपळ आणि चिंच या देशी व बहुउपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले. निसर्ग ग्रुपकडून याआधी लावण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनासाठी आळी करून त्यांना अधिक पाणी मिळण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली.
मातीतील सेंद्रिय घटक वाढवण्याचा प्रयत्न : यावेळी सर्व झाडांना जीवामृत मिश्रित पाणी टाकण्यात आले. जेणेकरून झाडांची वाढ सशक्त होईल व मातीतील सेंद्रिय घटक वाढून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, या उद्देशाने झाडांसाठी जीवामृत मिश्रित पाण्याचा वापर करण्यात आला.













