माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील; आमदार डॉ. अतुल भोसले व मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी
कराड/प्रतिनिधी : –
घनकचरा व्यवस्थापनातील रोल मॉडेल असणाऱ्या व स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कराड नगरपालिकेची स्वच्छतेतील कामगिरी गेल्या तीन वर्षांत घसरली आहे. शहरवासीयांनी आतापर्यंत पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना सहकार्य केले आहे. शहर स्वच्छतेत आघाडीवर राहावे, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे कराड पालिका स्वच्छतेत अग्रेसर राहावी, यादृष्टीने व्यापक बैठक घेऊन सुचना द्याव्यात, अशा मागणीचे पत्र लोकसेवा शहर विकास आघाडीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी डॉ. अतुल भोसले आणि मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले आहे.
कराडला कार्यकर्तृत्वाचा वारसा : कराड शहर हे प्राचीन काळापासून व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते. शहराला मोठा वारसा आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, स्व. यशवंतराव चव्हाण साहेब व दिवंगत माजी नगराध्यक्ष स्व. पी. डी. पाटील साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा कराड शहराला लाभला आहे. स्व. पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीतून कराड शहरामध्ये भुयारी गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया केंद्र व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विविध सोयी सुविधा उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे कराडवासीयांचे सार्वजनिक आरोग्य हे सतत चांगले राहिले असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
स्वच्छता उपक्रम यशस्वी करण्यात यश : केंद्र सरकारने २०१७ साली स्वच्छ सर्वेक्षण हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात भाग घेताना कराड पालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे सांगत श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, स्वच्छता दूत, स्वयंसेवी संस्था, शहरातील नागरिक व महिला या सर्वांच्या सहकार्याने स्वच्छता विषयक उपक्रम यशस्वी करण्यात कराड नगरपालिकेला यश आले.
स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम : याचाच परिणाम म्हणून २०१९ साली कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतरही देशपातळीवर पालिकेने अव्वल स्थान कायम राखले होते.
माझी वसुंधरा अभियानातही यश : महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातही कराड नगरपालिकेने पाहिला व दुसरा क्रमांक राज्य पातळीवर मिळवला होता. या स्पर्धेची कोट्यवधी रुपयांची बक्षिसे नगरपालिकेला मिळाली असून राज्यातील अन्य नगरपालिकांच्या पुढे कराड नगरपालिकेने स्वच्छता व आरोग्य या विषयात बेंच मार्क प्रस्थापित केला आहे. त्यामुळे अनेक नगरपालिका कराडला भेट देऊन या उपक्रमांची पाहणी करत असतात.
प्रशासक कालावधीत दुर्लक्ष : गेल्या दोन ते तीन वर्षांत कराड पालिकेचे प्रशासक कालावधीत स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे नमूद करत श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, यांमुळे कराडकर नागरिक तीव्र नाराज आहेत. नगरपालिकेने यातील लक्ष कमी केल्याने पालिका पातळीवरही मरगळ निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून स्वच्छतेतील नगरपालिकेची कामगिरी घसरली आहे.
प्रोत्साहन देणे आवश्यक : कराडकर नागरिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करताना दिसत आहेत. कराड दक्षिणचे नूतन आमदार या नात्याने कराड शहर हे रोल मॉडेल बनवण्याचा ध्यास आपण घेतला आहे. यासाठी आपण कराड नगरपालिकेला स्वच्छतेतील उपक्रमांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर हेही स्वच्छतेविषयक सकारात्मक असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.
नियोजनासाठी व्यापक बैठक घ्या : यासाठी कराड पालिकेत स्वच्छता विषयक व्यापक बैठक आयोजित करून लोकसहभाग वाढवून कराड शहर देशपातळीवर पुन्हा प्रथम क्रमांकावर आणण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. यासाठी कराड पालिकेत व्यापक बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणी या पत्रात जयवंतराव पाटील यांनी केली आहे.
