निवासराव थोरात; चार महिन्यांत उपकारांचा विसर, सह्याद्रि डबघाईला आणला
कराड/प्रतिनिधी : –
बाजार समिती, विधानसभेत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु, ‘सह्याद्रि’ची निवडणूक जाहीर झाल्यावर काहींनी स्वार्थापोटी आपल्या भूमिका बदलल्या. तरीही आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी एकमेकांत तडजोडी करण्याचेही प्रयत्न केले. स्वतःच्या पॅनेलची मोट बांधून आम्हाला चर्चेत गुंतवून ठेवले. तसेच उमेदवारांवर दबाव आणून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्नही झाले. मात्र, असुरी महत्त्वकांक्षा बळवलेल्यांना ‘सह्याद्रि’ची दुकानदारी मत्त्यापूरमधून चालू देणार नाही, असा इशारा स्व. यशवंतराव चव्हाण शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमुख निवासराव थोरात यांनी दिला.
पत्रकार परिषद : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या अंतिम उमेदवारांना चिन्ह वाटप केल्यानंतर दरम्यानच्या सर्व घडामोडींची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते.
उपस्थिती : यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पॅनलचे उमेदवार, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
५४ वर्षांत न्यायाची भूमिका घेतली नाही : सत्ताधाऱ्यांनी ५४ वर्षांत शेतकरी, सभासदांना कधीही न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, असे सांगताना श्री. थोरात म्हणाले, उलट सभासदांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी मी कायदेशीर लढाई लढली.
समविचारी लोकांनीच हरकत घेतली : कारखान्यात परिवर्तन घडवण्यासाठी ज्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन आम्ही लढा देणार होतो, त्यांनीच आमच्या अर्जावर हरकत घेतली. तरीही या निवडणुकीत आम्ही न्याय मिळवला असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव : एवढे होवूनही आम्ही एकास एक लढत देण्याच्या प्रयत्नात होतो. परंतु, त्यांनी चिन्ह वाटपातही प्रशासनाला सोबत घेऊन आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन पॅनेलच्या उमेदवार व चिन्हे जाहीर केली आणि बाकीच्यांना अपक्ष म्हणून वेगवेगळ्या चिन्हावर लढावे, असे सांगितले.
विरोधकांमध्ये धमक नाही : आम्हाला गाफील ठेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे सांगताना श्री. थोरात म्हणाले, यावरून विरोधकांकडे धमक नसल्याचे दिसून येते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. ५४ वर्षे संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांचा विधानसभेचा गुलाल ही निघाला नाही, त्यांनाच बाजूला ठेवले.
नेते आमचे पाठीशी : स्वाभिमानपोटी आम्हीही निवडणूक लढणार असून शेतकरी सभासदांना न्याय देण्यास भूमिका आमची आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अन्यायाविरोधात चिड निर्माण झाली : ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीसाठी मी कधीही उत्सुक नव्हतो, असे सांगत धरशील कदम म्हणाले, अन्यायाविरोधात चिड निर्माण झाल्याने आम्ही सभासदांना न्याय देण्यासाठी या पॅनेलची निर्मिती केली. परंतु, वेळोवेळी सभासदांचा प्रतिनिधी म्हणून मी कारखान्याच्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. विद्यमान चेअरमन यांनी सुडापोटी शेतकऱ्यांचा ऊस नेला नाही. म्हणून आपण वर्धन कारखान्याची निर्मिती केली. त्यांनी कारखान्यावर साडेसातशे कोटींचे कर्ज घेतले. यामुळे भविष्यात हा कारखाना डबघाईला जाईल.
एकही कामगार पर्मनंट केला नाही
विद्यमान चेअरमन यांनी एकाही कर्मचाऱ्याला परमनंट केले नाही, असे सांगत रामकृष्ण वेताळ म्हणाले, शेतकरी, सभासदांवर त्रास दिला. तर दुसरीकडे सभासदांना न्याय देऊ म्हणणारेच त्यांची दिशाभूल करत आहेत. विधानसभेप्रमाणे परिवर्तन करण्यासाठी एकास एक उमेदवार घेण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, काहींची महत्त्वकांक्षा बळवल्याने त्यांनी सभासद, शेतकऱ्यांसह सर्वांचा विश्वासघात केला असल्याचे त्यांनी सांगितले.
निवासराव थोरात सक्षम नेतृत्व
निवासराव थोरात यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यांचे काम चांगले आहे. सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका आम्ही घेतली. मात्र, काहींनी त्यांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव आणला. चर्चेचे केवळ नाटक केले. परंतु, आम्ही निवासराव थोरात यांच्या पाठीमागे ठामपणे असून ते कारखाना सक्षमपणे चालवतील, असा विश्वास धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कारखाना म्हणून सह्याद्रि पॅटर्न पुन्हा अंमलात आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कारखाना खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखा चालवला
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सह्याद्रि कारखान्याची निर्मिती केली. परंतु, ५४ वर्षे कारखान्यावर सत्ता असताना त्यांनी प्रगती केली नाही. स्वतःची खाजगी प्रॉपर्टी असल्यासारखा कारखाना चालवला. तालुक्यातील लगतचे बाकीचे कारखाने ‘सह्याद्रि’च्या पुढे गेले. ज्या सभासदांनी २० वर्षांपूर्वी शेअर्सपोटी तब्बल ५० कोटी भांडवल मिळवून दिले. मात्र, एक्सपांशनच्या नावाखाली जिल्हा बँकेचे कर्ज काढून कारखाना डबघाईला आणल्याचा आरोप रामकृष्ण वेताळ यांनी केला.
