आ. मनोज घोरपडे यांचा बाळासाहेब पाटील यांच्यावर आरोप; विधानसभेप्रमाणे एकास एक लढत देण्याचा प्रयत्न
कराड/प्रतिनिधी : –
‘सह्याद्रि’चे विस्तारीकरण तीन वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. आम्ही खटाव-माण साखर कारखाना उभारला, त्यावेळी पायाभरणीपासून अकराव्या महिन्यांत साखरेचे उत्पादन घेतले होते. इतर साखर कारखान्यांचे विस्तारीकरण अडीचशे कोटींमध्ये, तेही एक वर्षात झाले आहे. मात्र, ‘सह्याद्रि’ला त्याच गोष्टीसाठी 480 कोटी रूपये खर्च झालेत. ‘सह्यादि’च्या विस्तारीकरणासाठी 418 कोटी खर्च प्राथमिक दिसत असला, तरी ते साडेपाचशे, सहाशे कोटींपर्यंत खर्च गेला असून कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांनी ‘सह्याद्रि’ला कर्जाच्या गर्तेत घातल्याचा घणाघाती आरोप आ. मनोज घोरपडे यांनी केला.
आमदार गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवार (दि . ४) रोजी आ. मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
नवीन संचालक चांगला दर देतील : याप्रसंगी कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करून शेतकरी, सभासदांना चांगला दर देण्यासाठी नवीन संचालक काम करतील, असा विश्वासही आ. घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
एकाधिकारशाही विरोधात सभासदांमध्ये रोष : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे सांगत आ. घोरपडे म्हणाले, हा कारखाना सभासदांचा राहिला नसून तो पीता-पूत्रांच्या मालकीचा झाला आहे. कारखान्यातील या एकाधिकारशाहीविरोधात शेतकरी, सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन घडवून शेतकरी, सभासदच विद्यमान चेअरमन यांना घरी बसवतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विरोधकांचे प्रथमच एवढे अर्ज : ‘सह्याद्रि’च्या निवडणुकीसाठी प्रथमच विरोधकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असावेत. कारखान्याचा भावी चेअरमन सर्वसामान्य शेतकर्यांमधून निवडण्याचा संकल्प सभासदांनी केला असल्याचेही आ. घोरपडे यांनी यावेळी सांगितले.
एकत्र लढण्याचा निर्णय : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आपली काय कमराबंद चर्चा झाली? या प्रश्नावर बोलताना आ. घोरपडे म्हणाले, सह्याद्रि साखर कारखान्याची निवडणूक काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा अशा आम्ही सर्वांनी एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारखान्याच्या विद्यमान चेअरमन यांना घरी बसविण्याच्या दृष्टीने आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.
भूमिका जाणून घेण्यासाठी भेट : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते असून त्यांना मानणारे सभासद अधिक आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
एकास एक लढत देण्याचा प्रयत्न : विधानसभेप्रमाणे एकसंघ होऊन आम्ही कारखान्याच्या निवडणुकीला समोरे जाणार आहोत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीप्रमाणेच कारखान्याच्या निवडणुकीतही एकास एक लढत देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आ. घोरपडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाबांची भूमिका निकालानंतर स्पष्ट होईल : पृथ्वीराज चव्हाण यांनी आपणास काय शब्द दिला आहे? या प्रश्नावर बोलताना आ. घोरपडे म्हणाले, ज्यावेळी ‘सह्याद्रि’चा निकाल लागेल. त्यावेळी ते सर्वांच्या लक्षात येईल, असे सूचक वक्तव्यही आ. घोरपडे यांनी केले.
आजअखेर दाखल झालेल्या अर्ज
‘सह्याद्रि’ सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी मंगळवार (दि. ४) रोजी एकून ९१ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये एक नंबर गटात मंगळवारी पाच अर्ज (एकूण सात अर्ज) दोन नंबर गटात नऊ अर्ज, तीन नंबर गटात आठ अर्ज, चार नंबर गटात २१ अर्ज, पाच नंबर गटात १३ अर्ज (आजअखेर १४ अर्ज), सहा नंबर गटात १८ अर्ज, महिला गटात पाच अर्ज, राखीव गटात १२ अर्ज असे एकूण ९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर आजअखेर एकूण ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
