एकमताने बिनविरोध निवड; संचालक मंडळातर्फे सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था, कराडच्या उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर सर्व संचालकांच्या वतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
रिक्त पदावर निवडणूक : पतसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने संस्थेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. हे रिक्तपद भरण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सातारा तथा अध्यासी अधिकारी जे. पी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या सभेमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया झाली. त्यामध्ये अभिजीत चाफेकर यांची उपाध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड झाली.
नामांकित युवा उद्योजक : श्री. चाफेकर हे कराड शहरातील नामांकित युवा उद्योजक आहेत. निवडीनंतर सर्व संचालकांच्या वतीने जे. पी. शिंदे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील : या निवडीनंतर बोलताना श्री. चाफेकर म्हणाले, तरुण वयात एवढ्या मोठ्या संस्थेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी संचालक मंडळाने माझ्यावर सोपवून मला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे. संचालक मंडळाच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
उपस्थिती : संचालक सीए. आशुतोष गोडबोले यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे व सर्व संचालक मंडळाचे सदस्य, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थितीत होते.
