कराड/प्रतिनिधी : –
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्या वजनकाट्याची जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.
वजन काट्याची तपासणी : सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश काढले आहेत. यानुसार निरीक्षण अधिकारी श्रीमती साहिला नायकवडे, कराडचे वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, विशेष लेखा परीक्षक एस. पी. शिंदे आणि एस. आर. सानप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे सुनिल कोळी, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिपक पाटील, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे विशाल पुस्तके यांनी संयुक्तपणे जयवंत शुगर्स कारखान्याला अचानक भेट देऊन कारखान्याच्या ऊस वजनकाट्याची तपासणी केली.
वजनकाटा अचूक असल्याचा शेरा : ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजनही अचूकपणे होत असल्याचे दिसून आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.
उपस्थिती : यावेळी कारखान्याचे इन्स्ट्रुमेंट मॅनेजर अरुण खटके, केन मॅनेजर नाथा कदम, सुरक्षा अधिकारी विठ्ठल भोसले, केन यार्ड सुपरवायझर सतीश सोमदे, रविराज बनसोडे आदी उपस्थित होते.
