काँग्रेस संविधान बदलण्याचे खापर भाजपवर फोडून भीती घालते

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. सचिन कल्याणशेट्टी; कराडमध्ये भाजपचे संविधान जागर अभियान उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

भाजपवर संविधान बदलणार असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसनेच 85 वेळा संविधान बदलून मनमानी कारभार केला. तीच काँग्रेस आता भाजपवर संविधान बदलण्याचे खापर फोडून लोकांना भीती घालत आहे. परंतु, त्यापासून लोकांना सावध करायला हवे. त्यासाठी याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

संविधान जागर अभियान : कराडमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने संविधान जागर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आणीबाणी संविधान विरोधी कृती : काँग्रेसने त्याकाळात भाजपच्या विरोधात बोलणाऱ्यांना थोपवण्यासाठी, त्यांचा आवाज दाबण्यासाठी आणीबाणीचे काम केले. ती संविधान विरोधी कृती होती, असे सांगत आ. कल्याणशेट्टी म्हणाले, या गोष्टी लोकांना सांगण्याचे काम भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावे. संविधान वाचविणाऱ्या भाजप विरोधात काँग्रेसने रान पेटवले आहे. त्या चुकीच्या प्रचाराचे खंडन करण्यात भाजप कमी पडल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीत ती चूक झाली नाही. येथून पुढेही ती चूक होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सदस्य नोंदणीची सक्ती करा : जिल्ह्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची पार्श्वभूमी सांगत आ. डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले, त्यामध्ये भाजपमधून निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, भाजपचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी इच्छुकांची यादी करून त्यांना प्रत्येकी 1 हजार सदस्य नोंदणी करण्याची सक्ती करावी. जो सदस्य नोंदणीची दिलेली जबाबदारी पूर्ण करेल, त्यालाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करावे. तसेच ही योजना जिल्हाभर राबवावी, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

भाजपमुळे जगात मान उंचावली : भाजपच्या आदर्श कारभारामुळे देशातच नव्हे; तर जगात आपली मान उंचावली असल्याचे सांगत आ. मनोज घोरपडे म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात महायुती म्हणून भरघोस विकासाची संधी भाजप देत आहे. त्यामुळे भाजपसारख्या पक्षाला सामान्यांचा पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

…त्यामुळेच यश मिळाले : भाजपने सातत्याने सामान्यांच्या विकासाला हातभार लावल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले, भाजपने राबवलेल्या ‘लाडकी बहिण’सारख्या योजना थेट लाभाच्या ठरल्या. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला अभूतपूर्व यश संपादित करता आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या सकारात्मक प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. 

 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!