‘कृष्णा व जयवंत’ने फोडली ऊस दराची कोंडी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

3200 रूपये पहिली उचल जाहीर; डॉ. सुरेश भोसले यांची माहिती 

कराड/प्रतिनिधी : – 

रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने सन 2024-25या ऊसगाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाला प्रतिटन 3200 रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

शेतकरी, सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न : शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिली उचल जाहीर : यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3200 रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.

कृष्णाचे 1 लाख 87 हजार 800 मेट्रीक टन गाळप : कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास 25 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर 17 दिवसांत 1 लाख 87 हजार 800 मेट्रीक टन गाळप झाले असून, 1 लाख 81 हजार 60 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

जयवंतचे 94 हजार 220 मेट्रीक टन गाळप : जयवंत शुगर्सच्या यंदाच्या गळीत हंगामासही 25 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर 17 दिवसांत 94 हजार 220 मेट्रीक टन गाळप झाले असून, 77 हजार 650 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

आवाहन : सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

error: Content is protected !!