कराड दक्षिणच्या डोंगरी भागासाठी वरदायिनी ठरलेली उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत या योजनेसाठी लागणाऱ्या विद्युत जोडणीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची ग्वाही आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी दिली.
आढावा बैठक : येथील शासकीय विश्रामगृहात उंडाळे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जयदीप पाटील यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे उपअभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच या बैठकीत आ. डॉ. भोसले यांनी या योजनेमध्ये धोंडेवाडी व चौगले मळ्यासह भागातील अन्य गावांचा समावेश करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या.
डोंगरी गावांसाठी योजना : कराड दक्षिणमधील डोंगरी भागातील गावांसाठी राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु केली. पण सातत्याने उद्भवणाऱ्या विविध अडचणींमुळे ही योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही.
समस्या घेतल्या जाणून : उन्हाळ्याच्या दिवसात या भागातील गावांमध्ये पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठे हाल होतात. त्यामुळे ही योजना पूर्णक्षमतेने तातडीने कार्यान्वित होणे गरजेचे आहे. या योजनेबाबतच्या समस्या जाणून घेण्यासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहात पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
अन्य योजनांचाही आढावा : प्रारंभी, आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसह अन्य कोणकोणत्या पाणीपुरवठा योजना चालू आहेत व त्यांची सद्यस्थिती काय, याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी उंडाळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीतील कामाचा आढावा सादर करुन, विद्युत जोडणीच्या कामासाठी निधी आवश्यक असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधी आणणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. ही योजना तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेत धोंडेवाडी व चौगले मळासह भागातील अन्य गावांचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शेतकऱ्यांना मुबलग पाणीपुरवठा उपलब्ध करा
दरम्यान, कराड दक्षिणमधील अन्य पाणीपुरवठा योजनांची माहिती घेऊन, या योजना पूर्णक्षमतेने कार्यान्वित सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश आ. डॉ. भोसले यांनी प्रशासनाला दिले. शेतकरी बांधवांसह नागरिकांना वेळोवेळी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करावी. तसेच काही तांत्रिक अडचणी आल्यास त्याचा जलद गतीने निपटारा करावा, यासह विविध सूचना यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या.