प्रा. डॉ. बाबुराव गुरव; ‘यशवंतराव चव्हाण.. एक मुक्त चिंतन’ विषयावर व्याख्यान
कराड/प्रतिनिधी : –
एक महान लेखक, संवेदनशील कलावंत, तळमळीचे समाजकारणी, सहकार निर्माते व शिक्षणाचे प्रणेते, तसेच सुसंस्कृत आणि मुस्तुद्दी राजकारणी म्हणून थोर नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ओळख आहे. परंतु, विरोधी पक्षातील खासदारांचे समर्थन घेऊन पंतप्रधान होण्याची संधी असताना; वैचारिक द्रोह करायचा नाही, असे सांगून त्यांनी स्वाभिमानाने विरोधी बाकावर बसणे पसंत केले. त्यामुळे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे; तर संपूर्ण जगभरात एक तत्वनिष्ठ राजकारणी म्हणूनही ओळखले गेले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी केले.
व्याख्यान : येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात (टाऊन हॉल) कराड नगरपरिषद व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 51 व्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ‘यशवंतराव चव्हाण.. एक मुक्त चिंतन’ या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक सौरभ पाटील होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराड नगरपालिकेचे कर्व प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाडगे, प्रा. बी. एस. खोत, कर्व प्रशासकीय अधिकारी सौ. सुवर्णा फल्ले, ग्रंथपाल संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ढवळेश्वर हे मूळ गाव : यशवंतराव चव्हाण यांची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर बोलताना प्रा. डॉ. गुरव म्हणाले, देवराष्ट्रे हे यशवंतराव चव्हाण यांच्या मामाचे गाव असून विटा शहराजवळचे ढवळेश्वर हे त्यांचे मूळ गाव आहे. घरची अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशावेळी त्यांनी काहीकाळ वकिलाच्या हाताखाली बेलिक म्हणून काम केले. नंतर शिक्षणासाठी कराडला आले, ते कराडचे झाले.
भारताचा झेंडा फडकवला : कराडकरांनी शिवाजी सोसायटीत यशवंतराव चव्हाण यांना स्वतःच्या पैशातून घर बांधून दिल्याचे सांगत प्रा. डॉ. गुरव म्हणाले, मॅट्रिकचे शिक्षण सुरू असताना ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासात आले. त्यांची प्रेरणा घेत त्यांनी कराड येथील टिळक हायस्कूल समोरील एका झाडावर देशाचा झेंडा फडकवला. इंग्रजांनी त्यांना अटक केली. परंतु, देशाचा झेंडा फडकवणे हा गुन्हा नाही. तू माफी मागशील तर याद राख, असं ठणकवणाऱ्या मातोश्री विठामाता यांच्यासारख्या असंख्य जिजाऊ आजही भारतात आहेत. विठामाता यांच्या आदर्श संस्कारातूनच यशवंतराव चव्हाण घडले. पुढे वेणूताईंची त्यांना चांगली साथ मिळाली.
स्वातंत्र्य चळवळीतील मोठे नेते : यशवंतराव चव्हाण स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे नेते असल्याचे सांगताना प्रा. डॉ. गुरव म्हणाले, नाना पाटील तुरुंगात गेल्यावर त्यांचा लढा चालू ठेवण्याची जबाबदारी लोकांनी यशवंतरावांवर सोपवली होती. त्यांनी गुंडांनाही क्रांतिकारी चळवळीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या मवाळ भूमिकेचा स्वातंत्र्य सैनिकांनी विरोध केला. मात्र, नाना पाटील, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, तात्यासाहेब कोरे, नागनाथ अण्णा नायकवडी, ज्ञानोबा बुवा गुरव (तासगाव – कवठे), त्यावेळचे प्रसिद्ध वकील व त्यांचे जवळचे मित्र के. डी. पाटील (कामेरी) यांच्यासोबत त्यांनी चळवळीत काम केले, लढा दिला. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव मोहिते यांनीही यशवंतराव चव्हाण यांना सहकार्य केले.












