देटे पाटील महाराज; चुकीची भूमिका घेणाऱ्यांबाबत जरांगे-पाटील निर्णय घेतील
कराड/प्रतिनिधी : –
सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणच नव्हे; तर राज्यातील 288 मतदारसंघातील कोणत्याही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मराठा समाजातर्फे मनोज जरांगे – पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी याबाबत कोणी दिशाभूल करत असेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट मत मनोज जरांगे-पाटील यांच्या टीममधील विश्वासू देटे पाटील महाराज यांनी व्यक्त केले.
पत्रकार परिषद : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सकल मराठा क्रांती मोर्चा कराड तालुकातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कराड तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वत:ची राजकीय पोळी भाजणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका :मराठा क्रांतीसुर्य मनोज जरांगे-पाटील हे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या न्याय्य भूमिकेसाठी लढा देत असल्याचे सांगत श्री. देटे पाटील म्हणाले, मनोज जरांगे – पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 मतदारसंघापैकी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. जो योग्य उमेदवार असेल, त्याच्या पाठीशी रहा, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचे सांगून जर कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाची दिशाभूल करत असेल, तर त्यांच्यावर समाजाने विश्वास ठेवू नये. असा कोणत्याही प्रकार निदर्शनास आल्यास स्वतः जरांगे पाटील याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
काहींकडून समाजाची दिशाभूल : सकल मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्यातर्फे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडताना अॅड. दीपक थोरात म्हणाले, काल (रविवारी) झालेल्या एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार सांगता सभेत मराठा समाजातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चार उमेदवारांनी आपण अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे – पाटील यांची भेट घेऊन आलो असून, त्यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर व्यासपीठावरून सांगितले आहे. परंतु, यामध्ये कोणतेही तथ्य नसून त्यांच्याकडून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.