सावत्र भाऊ आणि बहिणींना जागा दाखवा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

चित्राताई वाघ यांची टीका; ओंड येथे महायुतीचा महिला मेळावा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या भावांनी ‘लाडकी बहीण’सारखी कल्याणकारी योजना राबवली. परंतु, ही योजना बंद पाडण्यासाठी त्याच बहिणींचे सावत्र भाऊ कोर्टात गेले. तसेच सावत्र बहिणींनीही या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे धादांत खोटे सांगत महिलांना पैशांची लाच देऊ नका, अशी भाषा वापरली. आया – बहिणींचा आधार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा सावत्र भाऊ आणि बहिणींना या निवडणुकीत जागा दाखवा, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तसेच सुप्रियाताई सुळे आणि प्रणितीताई शिंदे यांच्यावर केली.

ओंड : डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात बोलताना चित्राताई वाघ.

भव्य महिला मेळावा : ओंड (ता. कराड) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. विचारमंचावर उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले, कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तराताई भोसले (आईसाहेब), भाजप सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुरभीताई भोसले, गौरवीताई भोसले, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे, सारिका गावडे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सूर्य – चंद्र असेपर्यंत संविधान हटणार  नाही : महाविकास आघाडीचे नेते खोटे पण रेटून बोलणारे चोर आणि लुटेरे आहेत. त्यांनी संविधान हटवण्यात येणार असल्याची आवई उठवल्याचे सांगत चित्राताई वाघ म्हणाल्या, गोरगरीब, आदिवासींचे आरक्षण काढून घेण्यात येणार असल्याची भीती घातली. मात्र, मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केलेल्या बाबासाहेबांचे संविधान सूर्य – चंद्र असेपर्यंत कोणीही हटवू शकणार नाही. देशात 70 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने महिलांसाठी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच मोदींनी सार्वजनिक शौचालय, उज्वला योजना, जनधन योजना, मोफत धान्य, महिलांना 50 टक्के सवलतीत एसटी प्रवास, लखपती दीदी योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण अशा अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे सांगितले. 

अतुलबाबांना कोणीही हरवू शकणार नाही : करोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेला केवळ सल्ले देण्याचे काम केल्याचे सांगत वाघ म्हणाल्या, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातही याहून काही वेगळी परिस्थिती नव्हती. येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेसाठी काय केले, हे पहा. याउलट डॉ. अतुलबाबा भोसले हे करोना कालावधीत लाडक्या बहिणींच्या पाठीशी भावासारखे उभे राहिले. त्यांना आधार दिला, जनतेची सेवा केली. या मतदारसंघातील दीड लाख बहिणी जर अतुलबाबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या; तर त्यांना कोणीही हरवू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले ? : 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्याचे सांगत डॉ. अतुल भोसले म्हणाले, अडीच वर्षांत महाविकास आघाडीने महिलांसाठी एकही चांगली योजना आणली नाही. याउलट महायुतीने महिलांना सन्मान देण्याचे काम केले. लाडकी बहीण योजनेला येथील लोकप्रतिनिधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीचा जुमला असल्याचे म्हटले. तसेच या योजनेसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्याचे अधिवेशनात सांगत दुसरीकडे ही योजना आमची असल्याचाही दावाही त्यांनी केला. मग ते मुख्यमंत्री असताना पावणेचार वर्षांत महिलांच्या खात्यावर एकही पैसा आला का? अशा योजनांबाबत कधी ब्र शब्दही काढला का? असा सवाल उपस्थित करत भाषणबाजी करणाऱ्यांनी महिलांसाठी काय केले, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. 

अतुलबाबांना भाऊबीजेची भेट देऊया : डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लाडक्या बहिणींना, तसेच बांधकाम कामगारांना मोठा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे अतुलबाबांना आपण भाऊबीजेची भेट म्हणून विधानसभेत पाठवूया, असे आवाहन रोहिणी शिंदे यांनी उपस्थित महिलांना केले.

ओंड : महिला मेळाव्यास झालेली अलोट गर्दी.

अतुलबाबंना साथ देण्याची वेळ : करोना कालावधीत कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माता – भगिनी, तसेच गोरगरीब जनतेची सेवा केली आहे, त्यांना मोलाची मदत केली. कराडला पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर, तसेच पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यावर डॉ. अतुलबाबा भोसले जनतेसाठी धावून आले. बांधकाम कामगार आणि लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळवून दिला. आता आपण त्यांना साथ देण्याची वेळ आली असल्याचे सुरभीताई भोसले यांनी सांगितले. 

“खा कुणाचं बी मटण; दाबा कमळाचं बटन” 

या निवडणुकीत विरोधकांकडून अनेक अमिषे दाखवली जातील. मात्र, त्याला कोणीही भुलू नका. लाडक्या बहिणी आणि बांधकाम कामगारांचे फॉर्म भरून घेत त्यांना लाभ मिळवून देण्यापर्यंत अतुलबाबांनी मोठे परिश्रम घेतले आहे. त्यामुळे आपल्या या भावाच्या कष्टाचे चीज करण्यासाठी गृहलक्ष्मींनी आपल्या पतींवर लक्ष ठेवून “खा कुणाचं बी मटण; पण दाबा कमळाचं बटन” असा कानमंत्र द्यावा, अशी मिश्किल टिपण्णी चित्राताई वाघ यांनी करताच महिलांसह उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

महिलांच्या हाताला घरबसल्या काम देणार 

कराडच्या एमआयडीसीला फाईव्ह स्टारचा दर्जा देण्याची मागणी मी अमितभाई शहा यांच्याकडे केली आहे. त्याला त्यांनी होकार दिला असून या ठिकाणी आता मोठे उद्योग येतील. यातून अनेक युवक, नागरिकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून कराड दक्षिणसह तालुक्यातील अनेक महिलांच्या हाताला घरबसल्या रोजगार मिळवून देण्याचे कामही आपण करणार असल्याची ग्वाही डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी महिलांना दिली. तसेच आपला लाडका भाऊ, मुलगा म्हणून आपण मला मतरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित माता – भगिनींना केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!