कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून एकूण 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमवार, दि. 4 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दक्षिणमधून 22 उमेदवारांनी 28 अर्ज मागे घेतले. तर उत्तरमधून 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 22 उमेदवारांनी 28 नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केली होती. त्यापैकी 2 अर्ज अवैध ठरले होते. उर्वरित 20 अर्जांपैकी 12 जणांनी आपले अर्ज सोमवार, दि. 4 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात 8 उमेदवार उरले असल्याची अशी माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील यांनी दिली.
यामध्ये डॉ. अतुल भोसले – भारतीय जनता पार्टी (कमळ), पृथ्वीराज चव्हाण – इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), विद्याधर गायकवाड – बहुजन समाज पार्टी (हत्ती), इंद्रजित गुजर – स्वाभिमानी पक्ष (लिफाफा), महेश जिरंगे – राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), संजय गाडे – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), विश्वजीत पाटील अपक्ष (बॅट) व शमा शेख – अपक्ष (हीरा) अशी निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे आहेत.
तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 27 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे दाखल केली होती. यापैकी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे व डॉ. जस्मिन शेख यांनी दिली आहे.
यामध्ये बाळासाहेब ऊर्फ शामराव पांडुरंग पाटील, – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (तुतारी वाजवणारा माणूस), मनोज घोरपडे – भारतीय जनता पार्टी (कमळ), श्रीपती कांबळे – बहुजन समाज पार्टी (हत्ती), अंसारअली पटेल – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), सर्जेराव बनसोडे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) (शिवणयंत्र), सीमा पोतदार – राष्ट्रीय स्वराज्य सेना (बासरी), सोमनाथ चव्हाण – राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), अजय सूर्यवंशी – अपक्ष (ट्रम्पेट), दीपक कदम – अपक्ष (ग्रामोफोन), निवृत्ती शिंदे – अपक्ष (चालण्याची काठी), बाळासो पाटील – अपक्ष (एअर कंडिशनर), बाळासो पाटील – अपक्ष (कपाट), रामचंद्र चव्हाण – अपक्ष (टेबल), वसीम इनामदार – अपक्ष (ऊस शेतकरी) व वैभव पवार – अपक्ष (किटली) असे अंतिम उमेदवारांची नावे व चिन्हे आहेत.