दुचाकीस्वाराचा पाठलाग; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
कराड/प्रतिनिधी : –
कराड तालुक्यातील दक्षिण विभागातील डोंगरी भागासह लगतच्या ऊस पट्ट्यातील काले-उंडाळे परिसरात बिबट्याची चांगली दहशत पसरली आहे. कधी बिबट्या दुचाकी समोरून उसाच्या शेतात धूम ठोकतो. तर कधी चक्क दुचाकीस्वाराचाच पाठलाग करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे काले व उंडाळे परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.
या गावांमध्ये बिबट्याचा वावर : तालुक्यातील काले, बेलवडे बुद्रुक, कासारशिरंबे, नांदगाव, मनव, साळशिरंबे, जिंती, उंडाळे, येळगाव, येणपे, भूरभुशी, येवती, म्हासोली, तुळसण या भागासह विंग, येरवळे, किरपे, तांबवे, वसंतगड, केसे पाडळी, मलकापूर, आगाशिवनगर, चचेगाव, जखिणवाडी, मुनावळे, धोंडेवाडी, ओंड, ओंडोशी या भागात काही दिवसांपासून शेतकरी, ग्रामस्थांना सर्रास बिबट्याचे दर्शन होत आहे.
दुचाकीस्वाराचा केला पाठलाग :शनिवार, दि. 26 रोजी उंडाळे-तुळसण रस्त्यावर सायंकाळी बिबट्याने चक्क एका दुचाकीस्वाराचा पाठलाग केला. बिबट्या दुचाकी स्वराचा करत असलेल्या पाठलागाचा व्हिडिओ पाठीमागे असणाऱ्या वाहनातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात केला आहे. दरम्यान, संबंधित दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत दाखवलेल्या सावधानकीमुळे मोठा अनर्थ टळला.
उसाच्या शेतात ठोकली धूम : तत्पूर्वी, आदल्याच दिवशी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास काले परिसरातील वाठार-कालवडे रस्त्याकडेने चाललेल्या बिबट्याने दुचाकीसमोरून लगतच्या उसाच्या शेतात धूम ठोकल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सलग दोन दिवसांत झालेल्या या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थ, महिला, वयोवृद्ध व दुचाकीस्वारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन्ही व्हिडिओतील बिबट्या एकच? : दरम्यान, दोन्ही व्हिडिओंमध्ये दिसणारा बिबट्या एकच असल्याचा अंदाज असून तो बिबट्याचा छोटा बछडा असल्याचे बोलले जात आहे. परंतु, वन विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, वन विभागाने सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.
बिबट्याच्या बछड्याने घातला होता धुमाकूळ
एक-दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील बेलवडे बुद्रुक व परिसरात बिबट्याच्या एका बछड्याने असाच धुमाकूळ घातला होता. यावेळी बिबट्याची एक मादी आणि दोन बछड्यांचा वावर परिसरात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. यातील एक बिबट्याच्या बछडा दुचाकीस्वाराचा पाठलाग करत होता. तसेच लोकवस्तीलगत भटकी कुत्री व कोंबड्यांचाही बिबट्या पाठलाग करत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर काही दिवसांनी परिसरातील एका उसाच्या शेतात बिबट्याचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. त्याचा उपासमारी, निमोनिया व आतड्याला पिळ पडल्याने मृत्यू झाल्याचे शिवविच्छेदनातून स्पष्ट झाले होते. यावेळी पशुवैद्यकीय तज्ञांनी उपासमारीमुळे अशक्त झालेल्या बिबट्याच्या आतड्यांना सावजाचा पाठलाग करताना पीळ पडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्याचप्रमाणे काले-उंडाळे परिसरात दुचाकीस्वारांचा पाठलाग करणारा बिबट्या हा छोटा बछडा असावा, तसेच तो उपासमारीमुळे असे कृत्य करत असल्याचे शेतकरी, ग्रामस्थांचे म्हणणे आहे.