दक्षिणेत काँग्रेस सरस, भाजपलाही सुवर्णसंधी 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

विधानसभा रणांगण; दोन्ही पक्षांना एकदिलीची गरज, फंद-फितुरी रोखण्याचे आव्हान 

राजेंद्र मोहिते / कराड : –  

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रयत संघटना, इंद्रजीत मोहिते यांना मानणारा गट आणि राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सध्या काँग्रेस सरस असल्याचे चित्र आहे. तर याच मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून 2014, 2019 आणि आता 2024 पर्यंत भाजपची वाढलेली मतांची टक्केवारी, लोकसभेला छत्रपती उदयनराजेंना दक्षिणेतून मिळालेले मताधिक्य, माजी आमदार आनंदराव पाटील यांचा गट आणि शहर भाजप, पावसकर गट व संघ भाजपमध्ये एकदिली राहिल्यास दक्षिणेत भाजपलाही मोठी सुवर्णसंधी आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, राज्यात 2014 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सलग सातवेळा आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या माजी मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झालेल्या लढतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाजी मारली. तर 2019 मध्ये औटघटकेला विलासकाका आणि पृथ्वीराजबाबांमध्ये समेट झाल्याने अपक्ष लढलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मात देत पृथ्वीराज चव्हाण यांनी अपेक्षित विजय मिळवला. या दोन्हीवेळी मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिला, हे महत्त्वाचे.

दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत भाजपमधून नशीब आजमावणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या विलासकाकांपेक्षा केवळ 1,792 मते कमी मिळाली असली, तरीही दोन दिग्गजांच्या तुलनेत ती दखलपात्र म्हणून नोंदली गेली. या निवडणुकीत ते 18,260 मतांनी विजयापासून दूर राहिले. तर 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत केवळ 9,130 मतांनी पराभव पत्करावा लागलेल्या डॉ. अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्र्यांना तगडी टक्कर दिल्याने राज्यालाही त्यांची दखल घ्यावी लागली. या दोन्ही निवडणुकांत डॉ. भोसले यांच्या मतांमध्ये 24,554 इतकी झालेली घसघशीत वाढ तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मिळालेल्या 29,401 मतांवरून अधोरेखित होते.

आता 2024 मध्येही पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. अतुल भोसले यांच्यातच थेट लढत होणार आहे. त्यामुळे एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून दक्षिणेत मतांचा मतगठ्ठा आहे. तो एकत्र ठेवण्यासाठी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना दूर करत काँग्रेसच्या या दोन्ही गटांत एकदिली राखण्याचे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये डॉ. अतुल भोसले यांचे वाढणारे वर्चस्व पाहता त्यांना अंतर्गत सुप्त विरोध करणाऱ्या भाजपच्याच अन्य गटांमध्ये अद्याप धुसफूस चालू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथेही एकदिली नांदवत फंद-फितुरी रोखण्याचे मोठे आव्हान डॉ. अतुल भोसले यांच्यापुढेही उभा आहे. जो ही आव्हाने पेलण्यास यशस्वी झाला; त्याचाच गुलाल, अशीही दक्षिणेत चर्चा आहे.

पृथ्वीराज चव्हाण : प्लस पॉईंट 

  • मुख्यमंत्री असताना तब्बल 1800 कोटींची केलेली विकासकामे

  • स्वच्छ प्रतिमा

  • महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता

  • कराड आणि मलकापूर शहरातील नागरिकांचा मिळणारा पाठिंबा

  • आमदार म्हणून मतदारसंघात केलेली विकासकामे

  • केंद्र व राज्यातील गाढा अनुभव

  • पारंपारिक मतदार राखून ठेवण्यात यश

मायनस पॉईंट : 

  • पहिल्या फळीतील ठराविक पदाधिकाऱ्यांवर मतदार

  • नवीन, युवा कार्यकर्त्यांकडे जबाबदारीचा अभाव

  • ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात सातत्य नसणे

डॉ. अतुल भोसले : प्लस पॉईंट 

  • तरुण, युवा नेतृत्व व युवकांमध्ये वाढती क्रेझ

  • जनसंपर्कात सातत्य

  • पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पाठबळ

  • कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम

  • विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ

  • कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविडमध्ये केलेले काम

  • वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आणलेला सुमारे 700 कोटींचा विकासनिधी

मायनस पॉईंट : 

  • स्थानिक पातळीवरील दोन गटांतील मारक राजकारण

  • स्वपक्षातून होणारा सुप्त विरोध

  • कराड उत्तरमध्ये दखलपात्र समर्थक गटाचा अभाव

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!