विलासकाकांच्या आदर्श विचारांनुसार वाटचाल करा 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. संजय कळमकर; कोयना दूध संघावर कोजागिरी पोर्णिमा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – 

सहकारातून समृद्धी आणण्यासाठी  लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी विशेष प्रयत्न करून सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातून सत्तेची संधी दिली. परंतु, आज-काल राजकारणात अनेकांची आयाराम-गयाराम अशी अवस्था आहे. मात्र, आमदारकीची सप्तपदी पूर्ण करून राज्यात तत्त्वनिष्ठ, एकनिष्ठ व आदर्श काम करणाऱ्या काकांनी आदर्श विचारांची पिढी घडवली. आज त्यांच्या स्मृती जतन करताना सर्वांनी काकांच्या आदर्श विचारांनुसार वाटचाल करावी,  असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी केले.

खोडशी (ता. कराड) येथील कोयना संघावर माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केलेली कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोजागिरी साजरी करण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी सभापती आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, राफीकशेठ बागवान, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, प्रा. धनाजी काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ऊस कारखानदारी यशस्वी करून दाखवली : ग्रामीण माणूस, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सहकार चळवळ टिकली पाहिजे, असे सांगताना उदयसिंह पाटील म्हणाले, सहकारातील ऊस कारखानदारी आज आपण यशस्वी करून दाखवली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात काम करत असताना खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. मात्र, संघर्षाचा शेवट यशात होतो, हे गेल्या काही दिवसांपासून जनतेने पाहिले आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रबोधनाची कोजागिरी साजरी : यावेळी चंद्र प्रकाशात दुग्धपानाच्या आस्वादाबरोबर व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे विनोदी किस्से व विचार ऐकत प्रबोधनाची कोजागिरी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांची सांघिक विचाराची देवाण-घेवाणही झाली. तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट ठरले.

आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती : यावेळी बाजार समितीचे उपसभापती संभाजी काकडे, हणमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, प्रदीप पाटील, सतीश इंगवले, नितीन ढापरे, आत्माराम जाधव कोयना दूध संघाचे संचालक संचालक संपतराव इंगवले, निवासराव निकम, बाबुराव धोकटे, सुदाम चव्हाण, शिवाजीराव शिंदे, दीपक पिसाळ, सुदाम चव्हाण, तानाजी शेवाळे, धनाजी पाटील, शिवाजी गरुड, शंकर पवार, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुत्रसंचालन राजेंद्र जाधव, परिचय कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव-दुशेरेकर, संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई यांनी आभार मानले.

आचार-विचारांचा प्रकाश सर्वदूर पोहोचवा 

आज कराड तालुक्यात मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी आपल्यात नाहीत. अशा स्थितीत कराड तालुक्याची आचार, विचारांची घडी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कोजागिरी पौर्णिमेचेनिमित्त साधून तालुक्यातील कार्यकर्ते आज एकत्र आले. त्यांनी विचाररुपी मिळालेला आचार-विचारांचा प्रकाश सर्वदूर पोहोचवावा, असे आवाहनही उदयसिंह पाटील यांनी यावेळी केले. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!