दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेल्या कराडनगरीत अनेक देव- देवतांची मंदिरे असून, सण- उत्सवामध्ये त्या- त्या मंदिरांमध्ये उत्सविस्वरुपात कराडकर व पंचक्रोशीतील भक्तगण सण- उत्सव पार पाडत असतात. नवरात्रात विशेषतः दैत्यानिवारणीला नित्याने जणू नियम म्हणूनच दर्शनासह आरती, पूजेला जाण्याचे महिला अन् युवतीवर्ग व्रत पाळतात.
– सौ. अश्विनी विक्रांत शिर्के (कराड)
कराडनगरीच्या प्रवेशद्वारावर वसलेल्या दैत्यानिवारणीला कोयनामाई असेही संबोधले जाते.
कोयनाकाठी देवीचे भव्य मंदिर आहे. तिची कराडची ग्रामदेवता कृष्णामाईची बहिण अशीही ओळख आहे. या दोघी अध्यात्मिक अन् पौराणिक महती असलेल्या करहाटक नगरीच्या दोन भिन्न टोकांना वास्तव्य करून एकमेकीकडे बघत असल्याच्या त्यांच्या मूर्ती असल्याची भक्तगणांची भावना आहे.
कराडनगरीचे ग्रामदैवत श्री कृष्णामाईचा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कृष्णातीरावर देवीचे भव्य मंदिर असून मंदिरातील मूर्ती अतिशय सुबक व देखणी आहे. कृष्णामाईच्या उत्सवाला तीनशेहून अधिक वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. 1709 साली कृष्णाकाठी देवीची स्थापना झाली. औंध संस्थानच्या कारकिर्दीत 1811 मध्ये कृष्णामाईच्या उत्सवास प्रारंभ झाला. आजअखेर हा उत्सव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा केला जातो.
ग्रामदेवता उत्तरालक्ष्मी देवीचे वास्तव्य सोमवारपेठेत असून, नवरात्रात इथेही उत्सवी स्वरूप असते. आंबाबाई अर्थात महालक्ष्मी, यमाई, भवानीमाता, आदिमाया, मरीआई लक्ष्मी, रेणुकामाता- यल्लमाआई अशा विविध देवतांची मंदिरे कराडमध्ये आहेत. बहुतेक मंदिरे ही पुरातन असल्याची माहिती आहे. प्रत्येक देव- देवतीच्या मंदिराला तिच्या वास्तव्याला इतिहास आहे. त्या- त्या ठिकाणी पुजाऱ्यांची परंपरेने नेमणूक दिसते आहे.
शिवकाल व त्यापूर्वीपासून या मंदिरांचा इतिहास असावा. पंतांच्या कोठात वास्तव्यास असलेली तुळजाभवानी
माता हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. औंध संस्थानच्या राजधानीचे हे मूळस्थान असून, या गादीच्या अधिपतींनी तुळजा भवानीआईचे हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते. काही जुने- जाणते लोक या देवीला यमाई असेही म्हणत. नवरात्रात या मंदिराभोवती विद्युत रोषणाई, मंडप, सामुहिक पूजाअर्चा, आरती उत्साहात संपन्न होते.
सोमवारपेठेतच आंबाबाई देवीचेही मंदिर आहे.
काळे परिवारचे हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. मध्यवस्तीत हे मंदिर असल्याने अनेकजण या महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेवून आपल्या नित्याच्या कामकाजाचा श्रीगणेशा करीत असतात. येथूनच जवळ कन्याशाळेसमोर रस्त्याच्या बाजूला
यमाईदेवीचे मंदिर आहे. औंध संस्थानची देवता म्हणून यमाईदेवीची ख्याती आहे.
कराडचे मूळरहिवाशी भोई समाज असल्याचे संदर्भ आहेत. या समाजाच्या वास्तव्याच्या ठिकाणी भोईगल्लीत आदिमायादेवी
एका वास्तूच्या कामासाठी केल्या जात असलेल्या जमीन उत्खननावेळी मिळून आल्याचे संदर्भ आहेत. सर्वदेव्यांची देवी अशी महती असलेल्या आदिमाया देवीच्या मंदिराचा अलीकडेच सुंदर व दिमाखदार असा जीर्णोध्दार करण्यात आला आहे. हे जागृत देवस्थान असल्याची भक्तगणांची भावना असून, विशेषतः भोई समाजातील महिला व युवावर्ग मोठ्या उत्साहाने नवरात्रात अतिशय थाटामाटात उत्सव साजरा करतात. अनेक धार्मिक कार्यक्रम व विधी, महाप्रसादही पार पडत असतो.
मुख्य डाक कार्यालयाच्या समोरील परिसरात
मरीआई लक्ष्मीचे मंदिर असून, लोकसहभागातून जीर्णोध्दार झालेल्या या मंदिरातही नवरात्रात दर्शनासाठी गर्दी राहते.
सोमवारपेठेत डुबलगल्लीच्या उताराला रेणुकामाता- यल्लमा आईचे मंदिर आहे.
पवार परिवाराकडे देवीच्या पुजाआर्चेची जबाबदारी आहे. अतिशय साध्या जुन्या पद्धतीच्या वास्तूत देवी स्थानापन्न असून, भक्तगण आवर्जून रेणुकामाता – यल्लमा आईच्या दर्शनास येत असतात. रस्त्यावरच हे मंदिर असल्याने नित्यानेही भक्तगण रेणुकामातेचे दर्शन घेत असतात. स्वाभाविकपणे या मंदिरालाही नवरात्राचा साज असतो.
नवरात्रात नऊ देव्यांचे दर्शन घ्यावे, नऊ देव्यांची महती, माहिती जाणून- समजून- उमजून घ्यावी म्हटलं तर, या नऊ देव्या आहेतच. याच बरोबर सटवाई, रुक्मिणीमाता अशा अनेक देव्यांच्या मंदिरांचा उल्लेख करावा लागेल. मुळातच कराड हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जात असताना, शिवशंभू शंकरांची विविध अकरा रूपे पंचक्रोशीत जशी सामावलेली आहेत. तशीच कृष्णामाई, दैत्यनिवारणी, उत्तरालक्ष्मी यासह जवळपास सर्वच प्रमुख देव्यांची मंदिरे या परिसरात आहेत.
नवरात्र, दिवाळी, दसरा आदी सण- उत्सवात या देव- देवतांच्या पूजाअर्चा आणि दर्शनाची भक्तांमध्ये आस दिसून येते. एकंदरच या मंदिरांचा, त्यात वास्तव करून असलेल्या देव-देवतांची कराडकर जनतेवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या विविध रूपांचा विचार केल्यास या नगरीला व तिच्या परिसराला हजारो वर्षांचा अध्यात्मिक, पौराणिक वारसा – इतिहास असण्याची सहज आणि स्वाभाविक जाणीव होते. अनेकांनी हा वारसा शोधला आहे, लिहिला आहे. तो थोडक्यात शब्दबध्द करणे शक्य नाही. म्हणून हा धावता आढावा घेतला असून, प्रत्येक देवीच्या माहितीची आणि महतीची ओळख करून देण्याच्या संकल्प आहे. तो सिद्धीस जावा, ही ईश्वर चरणी प्रार्थना.