‘जन स्वराष्ट्र’ जनतेच्या विश्वासाचे माध्यम होईल – धारेश्वर महाराज
कराड/प्रतिनिधी : –
सर्वसामान्य, गोरगरीबांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्यायिक भूमिका आणि दीनदुबळ्यांचा आवाज बनल्याने ‘जन स्वराष्ट्र’ जनतेच्या विश्वासाचे माध्यम होईल, असा विश्वास गुरुवर्य श्री डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केला.
ईश्वरपूर (उरुण-इस्लामपूर), ता. वाळवा (सांगली) येथील अंबिका (यमाईमाता) मंदिरात घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार, दि. 3 रोजी सायंकाळी ‘जन स्वराष्ट्र’ या वृत्तपत्राच्या शुभारंभ अंकाचे प्रकाशन पाटण तालुक्यातील (सातारा) तीर्थक्षेत्र श्री धारेश्वरचे मठाधिपती गुरुवर्य श्री डॉ. निळकंठ शिवाचार्य महाराज यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आले. यावेळी विचार व्यक्त करताना ते बोलत होते.
प्रसार माध्यमांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची : श्री धारेश्वर महाराज म्हणाले, सध्याच्या बदलत्या प्रगत आधुनिक, तंत्रज्ञानाच्या युगात प्रसार माध्यमांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, प्रशासन, कायदा, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, कृषी आदी क्षेत्रांबाबत समान न्यायाची भूमिका ठेवून कार्य करावे. तसेच वास्तववादी व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य केल्यास आपला मनोदय सिद्धीस जाईल, असे शुभाशीर्वादही त्यांनी यावेळी दिले.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी अंबामाता मंदिराच्या पुजारी, कथा प्रवक्त्या, ह. भ. प. सौ. विजया अशोक गुरव, जन स्वराष्ट्रचे संपादक राजेंद्र मोहिते, सहसंपादक अशोक सुतार यांच्यासह शिष्यगण व भक्तगण उपस्थित होते.
जाणकारांनी केल्या अपेक्षा व्यक्त : दरम्यान, जन स्वराष्ट्रचा शुभारंभ अंक अनेकांच्या हातात पडल्यानंतर त्यांनी अंकाचे अवलोकन करून अंकाची मांडणी, बांधणी, दर्जा आदी बाबींचे कौतुक केले. तसेच याप्रसंगी काही जाणकारांनी अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या. तसेच जन स्वराष्ट्रच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.