कराड दक्षिण मतदारसंघाची परंपरा टिकवण्याची जबाबदारी घ्या 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आ. पृथ्वीराज चव्हाण; कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांच्या वाशी येथील स्नेहमेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद 

कराड/प्रतिनिधी : –

कराड हे भरभराटीचे शहर असल्यामुळे शेजारच्या लोकांना रोजगार मिळून प्रगती होत आहे. परंतु, काही जणांकडून केवळ मतासाठी इथे जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न होतोय. असे झाल्यास कराडची बाजारपेठ रुसेल व अर्थकारण धोक्यात येईल. त्यासाठी कराडमध्ये शांतता प्रस्थापित करणे, शहराची भरभराट टिकवून ठेवणे यासह कराडला एक युनिव्हर्सिटी टाऊन करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचबरोबर यापुढील काळात आपले जीवन सुसह्य राहण्यासाठी, महाराष्ट्राला वाचविण्यासाठी, दक्षिण कराड मतदारसंघाची परंपरा टिकवून ठेवण्याच्या लढाईत सहभागी होण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chauhan) यांनी व्यक्त केले.

कराड दक्षिणस्थित रहिवाशांचा स्नेहमेळावा : वाशी (नवी मुंबई) येथील विष्णूदास भावे सभागृहात कराड दक्षिणमधील मुंबईस्थित रहिवाशांचा स्नेहमेळावा भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. मेळाव्यास कराड दक्षिणस्थित मुंबईवासियांनी हजारोंच्या संख्येने उस्फुर्तपणे हजेरी लावली होती. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्य आणि स्वच्छ प्रतिमा असल्याने त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बहुमताने विजयी करण्याचा निश्चय करण्यासाठी गर्दीने सभागृह अक्षरशः खचाखच भरले होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी आ. उल्हासदादा पवार, आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, अजितराव पाटील – चिखलीकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब जाधव, दिपकशेठ लोखंडे, मुंबई काँग्रेसचे सचिव बाळासाहेब थोरात, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, तानाजीराव पाटील, सह्याद्री सहकारी बँकेचे अध्यक्ष पुरशोत्तम माने, प्रदीप साळुंखे, राजाराम पाटील, सचिन पाटील, बाबासाहेब बागल, ज्ञानकृपा पतपेढीचे संस्थापक बाजीराव शेवाळे, शिवशाही कामगार संघटनेचे अध्यक्ष सचिन कळंत्रे, निलेश मोरे, वसंतराव चव्हाण, बाबासाहेब जाधव, तानाजी तोडकर, नितीन शिंदे, एकनाथ तांबवेकर, बाळासाहेब खबाले, गोटेवाडीचे सरपंच अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आ. पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून अभिवादन केले.

राष्ट्रीय काँग्रेसचा विचार सोडलेला नाही : याप्रसंगी बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 1952 पासून आजपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचा विचार सोडलेला नाही, हे कराड दक्षिण मतदारसंघाचे वैशिष्ठ्य आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मी या मतदारसंघाचा विकास आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करू शकलो. तुम्ही मला पदरात घेतले. व विश्वास टाकला. माझ्याआधी यशवंतराव मोहिते व विलासराव पाटील – उंडाळकर यांनी काम केले. तुमच्या प्रेम व विश्वासामुळे मला राज्याचे मुख्यमंत्री होता आले. त्यावेळेस राजकीय व्यक्ती व प्रशासनावरील विश्वास ढासळला होता. तो विश्वास पुन्हा मिळविण्याची माझ्यावर जबाबदारी होती.

दक्षिणेत 1800 कोटी रुपयांची कामे : आ. चव्हाण म्हणाले, मला दक्षिण कराड मतदारसंघात 1800 कोटी रुपयांची कामे करण्यात यश आले. कराड भोवतीचे पाच रस्ते राज्य मार्गापेक्षा जास्त दर्जाचे झाल्याने कराड भोवतीच्या भागाचे व्हॅल्यू क्रिएशन झाले व राहणीमानाचा दर्जा उंचावला. दक्षिण कराड मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील लोकांना आपला मुलुख सोडून मुंबईला यावे लागले. सुरुवातीस तुम्हाला सन्मान मिळाला नाही. बरेचजण माथाडी म्हणून आले. त्यानंतर माथाडींसाठी कायदा झाल्यानंतर तुमचा सन्मान वाढला. पण आजही गाव सोडून आल्यानंतर उदरनिर्वाह करणे कठीण ठरत आहे. 

विलासकाकांमुळे उंडाळे खोऱ्यात नदीजोड प्रकल्प : आ. चव्हाण म्हणाले, ही परिस्थिती ओळखून विलासकाकांमुळे उंडाळे खोऱ्यात नदीजोड प्रकल्प झाला. तेथील शेती बागायती झाली. आजही या भागात गेल्यानंतर स्विझरलँडमधील ग्रामीण मुलुखाची आठवण होते. त्याठिकाणी रम्य परिसर करायचा आहे. उद्योग, कारखानदारी व शिक्षणाचा विस्तार करायचा आहे. त्यातून तेथे रोजगार निर्माण होईल. परंतु गेलेला दहा वर्षाचा काळ हरवलेले दशक असल्याने हे स्वप्न अपुरे आहे. ते पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

रेठऱ्यात 45 कोटीचा नवीन पुल : दक्षिण कराड मतदारसंघातील रस्त्यांची कामे झाली आहेत. त्याचबरोबर मूलभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. कोडोली येथे नदीवर पुलाचे काम सुरू आहे. तर रेठऱ्याच्या जुन्या पुलाची दुरुस्ती करत 45 कोटीचा नवीन पुल उभारला जात असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा : आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रात आणि राज्यात काम केले आहे. त्यांचा अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे या नेतृत्वाचा पाठीराखा म्हणून तुम्ही आणि आम्ही त्यांना पुन्हा निवडून देण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन आ. भाई जगताप यांनी केले.

दक्षिणेतील जनतेने काँग्रेसची वैचारिक नाळ सोडलेली नाही : कराड दक्षिण मतदारसंघातील जनतेने काँग्रेसची वैचारिक नाळ कधी सोडलेली नाही. लोकशाही, समता आणि मानवतेच्या पायावर काँग्रेस उभी आहे. हा पाया यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, वसंतदादा पाटील, आनंदराव चव्हाण यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी उभा केला. यशवंतराव मोहिते यांनी समता, मानवता व बहुजनांचा विचार जोपासला. त्यांच्या बरोबरीने विलासकाका उंडाळकर यांनी विचार जोपासला. ही कराड दक्षिण मतदारसंघाची परंपरा जोपासा, असे आवाहन उल्हासदादा पवार यांनी केले.

पृथ्वीराजबाबांनी कराडचे नाव देशपातळीवर नेले : आ. सतेज पाटील म्हणाले, 1952 पासून काँग्रेसच्या विचाराला जोपासणारा कराड दक्षिण मतदारसंघ आहे. पृथ्वीराजबाबांनी कराडचे नाव देशपातळीवर नेवून ठेवले. राज्य आणि देशात गेल्यानंतर आपण अभिमानाने आमचे आमदार पृथ्वीराजबाबा असल्याचे सांगतो. त्यांनी एका बाजूला विकास केला. व दुसऱ्या बाजूला विरोधी सरकार असतानादेखील आपला विधिमंडळात दबदबा राखला आहे. कराड दक्षिणेची ही ताकद पुन्हा विधानसभेत पाठवा. पृथ्वीराजबाबांनी जी पुण्याई कमावली आहे. याचा फायदा आपण घेवून मतदारसंघाचा विकास साधूया. एका निवडणुकीत स्वर्गीय प्रेमलाकाकी उभ्या असताना त्यांच्या प्रचाराची विलासकाकांनी धुरा स्वीकारली होती. आताही इतिहासाची पुनरावृत्ती होत असून, येणाऱ्या निवडणुकीत पृथ्वीराजबाबा उमेदवार असून, उदयसिंह पाटील यांनी जबाबदारी घेतली आहे, यासारखा योग कोणता नाही. 

कोणत्याही अमिषाला बळी पडू नका : अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही वैचारिक साथ करणे महत्वाचे आहे. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. हेवेदावे बाजूला ठेवा. उद्या कोण आमदार होणार आहे, याची चिंता करू नका. पूर्वजांनी हा मतदारसंघ एका विचारसरणीमध्ये बांधला. तो आहे असा आपणाला राखायचा आहे. मग परिस्थिती काय होईल, अमिषे कोणती येतील, याची पर्वा करू नका. 

अजितराव पाटील-चिखलीकर व प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा शेवाळे यांनी आभार मानले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

आणखी वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!