डॉ. अतुलबाबा भोसले यांचा विश्वास; कराड दक्षिणमधील पुणेस्थित रहिवाशांचा मेळावा उत्साहात
कराड/प्रतिनिधी : –
अनेक वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कराड दक्षिणमधील अनेक ग्रामस्थ पुण्यात आले. त्याकाळी कुणाचेही पाठबळ नसताना त्यांनी पुण्यात आपली स्वतःची ओळख निर्माण केली. अशा काळात त्यांनी कराडशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही. आपल्या कराड दक्षिणच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत 700 कोटींपेक्षा जास्त निधी आणला. येत्या काळात कराड दक्षिणच्या चौफेर विकासासाठी पुणेस्थित कराडकरांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले (Dr. Atul Bhosle) यांनी व्यक्त केला.
भाजप कराड दक्षिणच्यावतीने पिंपरी – चिंचवडमधील चिंचवडे हॉलमध्ये कराड दक्षिणमधील पुणेस्थित रहिवाशांचा कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्याला कराडमधील पुणेस्थित रहिवाशांनी प्रचंड गर्दी केली होती.
कराड दक्षिणच्या विकासासाठी भरभरुन निधी :पुणेस्थित रहिवाशांशी संवाद साधताना डॉ. अतुल भोसले पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिणकडे विशेष लक्ष देऊन, मतदारसंघाच्या विकासासाठी भरभरुन निधी दिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील रस्ते, पाणंद रस्ते, कराडचे स्टेडियम अशा अनेक पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटनही झाले आहे.
शिरवळला ‘कृष्णा’चा भव्य कॅम्पस उभारणार :कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आपल्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लवकरच पुण्यालगत शिरवळ येथे ‘कृष्णा’चा भव्य कॅम्पस उभारला जाणार असून, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.
पिंपरी – चिंचवडला कृष्णा बँकेची शाखा सुरू करणार :आपल्या सर्वांच्या सोयीसाठी पिंपरी – चिंचवड विभागात लवकरच कृष्णा सहकारी बँकेची शाखा सुरू करणार आहे. तसेच इंग्रजी माध्यमाची शाळादेखील उभारण्याचा मानस आहे. येत्या काळात कराड दक्षिणचा महायुती सरकारच्या माध्यमातून चौफेर विकास करण्यासाठी आपण सर्वजण भक्कम पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती :याप्रसंगी भाजपाचे पिंपरी – चिंचवड उपाध्यक्ष पोपटराव हजारे, शिवसेना नेते अमोल शेवाळे, शिवव्याख्याते नानासाहेब पाटील, उद्योजक विनोदराव मुळूक, क्षिप्रा कुलकर्णी, सागर नकाते, वसंत पावणे, सुनील पवार, संतोष जाधव, राज जाधव, अमर पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, वसंतराव शिंदे, गजेंद्र पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रकाश पाटील, भाजपाचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, अतुल शिंदे, मलकापूरचे माजी सभापती राजेंद्र यादव, आर. टी. स्वामी, कुणाल घमंडे यांच्यासह विविध मान्यवर व पुणेस्थित रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.