कराड/प्रतिनिधी : –
शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घारेवाडी, ता. कराड येथे फक्त महिलांसाठी आणि 18 वर्षांवरील मुलींसाठी येत्या शनिवारी (28) व रविवारी (29) सप्टेंबरला शौर्यवर्धीनी सखी हृदय संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी नाममात्र दोनशे रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असून त्यामध्ये जेवण, चहा नाश्ता, राहणे, निसर्गाच्या सान्निध्यात भ्रमंती याची उत्तम सोय करण्यात आली आहे आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शकांची मांदियाळी : ह्या सखी हृदय सम्मेलनात एकापेक्षा एक तज्ज्ञ मार्गदर्शकांची मांदियाळी असणार आहे. तसेच महिला व मुलींना व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनासह मोठी वैचारिक शिदोरीही मिळणार आहे.
शनिवारी या तज्ञांची होणार व्याख्याने : यामध्ये उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे समजून उमजून घेताना, स्त्री रोग तज्ञ डॉ. सविता मोहिते यांचे महिलांचे आरोग्य आणि बरच काही, सुधाताई कोठारी यांचे स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, लेखिका मीनाताई नाईक पॉक्सो कायद्यावर आधारित “अभया” हा एकपात्री प्रयोग आणि चर्चा सत्रात महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे.
रविवारी या विषयांवर मार्गदर्शन : रविवारी (29 सप्टेंबर) रोजी सुरुवात निसर्ग भ्रमंतीने होईल. त्यानंतर मानसोपचार तज्ञ उमाताई माने यांचे मैत्री स्वतःशी आणि शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख (काकाजी) यांच्या व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
महिलांची मोफत आरोग्य तपासणी : ह्या सखी हृदय संमेलनात मॅमोग्राफी, अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे गर्भाशय मुखाची तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच डॉ. सुशांत मोहिते यांच्या नवचैतन्य पथोलॉजी लॅब, कृष्णा नाका, कराड, तसेच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक डॉ. विकास गरुड यांच्यावतीने महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी होणार आहे.
महिलांची अनोखी सहल : सखी हृदय संमेलनात महिलांची एक अनोखी सहल होणार असून दोन दिवसांचे माहेरपणही महिला अनुभवणार आहेत.
त्वरित नावनोंदणी करा : महिलांमध्ये लोकप्रिय अशा शिवम प्रतिष्ठानच्या सखी हृदय शिबिरासाठी सहभाग होण्यासाठी त्वरित नावनोंदणी करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.