Edition

कराड दक्षिणमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’; १,६५० दाखल्यांचे वितरण

Share करें

✓ Link copy हो गया!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

कराड/प्रतिनिधी : – 

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांना शासकीय योजनांसाठी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उपयुक्त ठरत आहे. कराड दक्षिण मतदारसंघात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. अतुल भोसले यांनी केले.

विंग : महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात बोलताना आ.डॉ. अतुल भोसले.

महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विंग (ता. कराड) येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

समाधानकारक कामगिरी : शेतकरी, महिला, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याचे सांगत आ. भोसले म्हणाले, या योजनांचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे. कराड तालुक्यातील विविध विभागांची कामगिरी समाधानकारक असून, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. एस.आय.आर. मोहिमेतही प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, उपनिबंधक अर्चना यादव, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, पंचायत समिती सभापती नंदाताई यादव, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सरपंच दिपाली पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

१० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे १० लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा उद्देश आहे. सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा तसेच एकही पात्र व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच विविध योजनांशी संबंधित १ हजार ६५० दाखल्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Share करें

✓ Link copy हो गया!

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail