पुणे विभागात प्रथम; महाराष्ट्रातील सातवा मतदारसंघ, ३ लाख ३ हजार २०२ मतदारांच्या नोंदींचे काम पूर्ण
कराड/प्रतिनिधी : –
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे १०० टक्के काम पूर्ण करणारा पुणे विभागातील पहिला आणि राज्यातील सातवा विधानसभा मतदारसंघ ठरण्याचा मान कराड दक्षिणने मिळवला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि विविध शासकीय विभागांनी समन्वयाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाल्याची माहिती मतदान नोंदणी अधिकारी तथा कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३० जूनपासून सुरू झालेल्या विशेष सखोल पुनरिक्षण अभियानात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदारांच्या घरोघरी भेटी देत मतदार यादीतील नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ३४२ मतदान केंद्रे असून ३ लाख ३ हजार २०२ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये १ लाख ५० हजार २६ महिला, १ लाख ५३ हजार १४२ पुरुष आणि ३४ इतर मतदारांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. मतदारांच्या नोंदींची घरभेटीद्वारे तपासणी, माहितीची पडताळणी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
या मोहिमेत सातारा तहसीलदार रोहिणी शिंदे, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मलकापूरचे मुख्याधिकारी कपिल जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी शैलेश पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश विभुते, निवासी नायब तहसीलदार बाबूराव राठोड, महसूल नायब तहसीलदार महेश उबारे यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, केंद्रप्रमुख, महसूल कर्मचारी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी सेविका, विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, संकलन पथक तसेच आयटी टीमने परस्पर समन्वयातून काम केले.
दरम्यान, ३ ते ८ ऑगस्टदरम्यान अनकलेक्टेबल फॉर्मची फेरपडताळणी, मॅपिंग न झालेल्या मतदारांची माहिती अद्ययावत करणे, नोंदींमधील त्रुटी दूर करणे आणि डिजिटाइज केलेल्या नोंदींची पुढील टप्प्यात तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत होण्यास मदत होणार असल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.








