Edition

सहकारला रयतचा हात देऊया 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर; कार्वेत जाहीर प्रचारसभा, ‘संघर्ष नव्हे, सहकार्याची गरज’ – डॉ. सुरेश भोसले 

कराड/प्रतिनिधी : – 

स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) आणि स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी उभ्या केलेल्या सहकार चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी संघर्षाऐवजी सहकार्याची भूमिका स्वीकारण्याची वेळ आली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाच्या त्या वाटा पुन्हा रुंदावण्यासाठी ‘सहकारला रयतचा हात’ देण्याचे आवाहन रयत संघटनेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले.

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, पै. आनंदराव मोहिते, प्रा. शरद काटकर, उमेदवार बी. एन. थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महायुतीच्या माध्यमातून एकत्र : राजकीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात; मात्र सहकारी संस्था टिकवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगत ॲड. उंडाळकर म्हणाले, आमदार डॉ. अतुल भोसले आणि मी आज महायुतीच्या माध्यमातून एकत्र काम करत आहोत. कृष्णा कारखान्याच्या सभासदांनीही सहकार्याचा हा विचार स्वीकारला आहे. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा विकासासाठी सहकार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे.

संघर्षाऐवजी सहकार्यातूनही मोठे यश मिळते : स्व. विलासकाकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक वेळी संघर्षातूनच यश मिळते असे नाही; अनेकदा सहकार्यातूनही मोठे यश मिळते, असे सूचक विधानही ॲड. उंडाळकर यांनी यावेळी केले.

परस्पर सहकार्य कायम राहील : कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले म्हणाले, सहकाराची लढाई ही स्वातंत्र्यलढ्याइतकीच कठीण आहे. आमच्या व उदयदादांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यातून शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग मिळाला. आता तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आप्पासाहेब आणि विलासकाका शेवटपर्यंत एकत्र राहिले. आज आम्हालाही एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. साखर कारखाने, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, बँका, पतसंस्था, तसेच इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून परस्पर सहकार्य कायम राहील.

मतभेद विसरून एकदिलाने काम करूया : कारखान्याविषयी बोलण्याऐवजी इतर विषयांवर भाष्य करून सभांमध्ये मनोरंजन केले जात असल्याची मिश्कील टीका विरोधकांवर केली. तसेच आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करण्याचे आवाहन प्रा. धनाजी काटकर यांनी सभासद शेतकऱ्यांना केले.

उदयदादाही आमदार व्हावेत : भोसले आणि उंडाळकर घराण्यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करताना भविष्यात कराडमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होण्याचे संकेत डॉ. सुधीर जगताप यांनी दिले. कराडमध्ये तिसरा विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्यास ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना आमदार म्हणून पाहण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणूक स्तरावरही भोसले-उंडाळकर यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

मनोगत : यावेळी सुजित थोरात, रंगराव थोरात (सावकार) आणि प्रताप कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव जानुगडे यांनी केले, तर आभार अशोकराव थोरात (बापू) यांनी मानले. सभेला कार्वे-काले परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोटाळ्यांच्या पैशांतून नवा कारखाना निघाला असता 

विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना डॉ. सुरेश भोसले यांनी गंभीर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप केले. तोडणी-वाहतूक संघटनेत सुमारे ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तसेच ७७८ सभासदांच्या कथित बनावट सह्यांद्वारे कर्जप्रकरणे, ३२०० कामगारांची भरती आणि नोंदणी नसलेल्या १४०० कामगारांवर दरमहा सुमारे ५० लाखांचा खर्च झाल्याचा आरोपही केला. या व्यवहारांमधील कोट्यवधी रुपयांचा हिशेब अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगत, ‘या घोटाळ्यांच्या पैशांतून एक नवा साखर कारखाना उभा राहिला असता,’ अशी टीका त्यांनी केली. तसेच कारखाना आमच्या ताब्यात आला तेव्हा आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. राज्यभर झालेली बदनामी दूर करून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

उदयदादांना उज्ज्वल भविष्य 

स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्चात ॲड. उदयसिंह पाटील यांनी संघटना, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रभावी नेतृत्व केले असून, लोकांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे गौरवोद्गार डॉ. सुरेश भोसले यांनी काढले. पुढील निवडणुकांपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडतील. त्याअनुषंगाने भविष्यातील चित्र स्पष्ट दिसत असून, उदयदादांना उज्ज्वल भविष्य आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक संकेत दिले. येणारी ३० ते ३५ वर्षे नव्या पिढीची आहेत. आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे ‘सहकार आणि राजकारणाच्या माध्यमातून सर्व इच्छित उद्दिष्टे साध्य होतील’, अशा सूचक विधानातून त्यांनी भविष्यातील राजकीय नांदीबाबत कार्यकर्त्यांना आश्वस्थ केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail