शंभूराज देसाई; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी अभ्यासपूर्वक उमेदवारी
कराड/प्रतिनिधी : –
राजकारण आणि समाजकारणात संघर्ष अटळ असतो. मात्र प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. मी स्वतः संघर्ष करतच आज या टप्प्यावर पोहोचलो असून, येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सखोल अभ्यास करूनच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जातील, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री,शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी केले.
शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळावा : कालवडे, ता. कराड येथे काले जिल्हा परिषद गटातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, कालेचे युवा नेते पै. राणा पाटील, अक्षय मोहिते, गुलाबराव पाटील, राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारीबाबत योग्य निर्णय घेऊ : यावेळी बोलताना ना. देसाई म्हणाले, राजकारणात पाऊल टाकल्यापासून आजपर्यंत मी सातत्याने संघर्ष केला आहे. मात्र सचोटी आणि प्रामाणिकपणामुळेच मला मंत्रीपद मिळाले. तसेच दोन वेळा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषवण्याचा मान मिळाला, हे माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सातारा जिल्हा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सखोल अभ्यास सुरू असून, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, से त्यांनी नमूद केले.
धनुष्यबाण घरापर्यंत पोहचवा : शिवसेनेच्या कामात सातत्य ठेवणारे आणि पुढेही निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते यांच्यासोबत मी ठामपणे उभा राहीन. राजकारण म्हणजे संघर्ष असतो, पण कोणत्याही परिस्थितीत पक्षनिष्ठा कमी करता कामा नये. जो कार्यकर्ता पक्षनिष्ठेने काम करतो, त्याच्यासाठी पक्षनेतृत्व कधीच कमी पडत नाही. विकासकामांची मागणी असो किंवा पक्षाकडून लागणारी मदत, ती निश्चित मिळेल; मात्र त्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारांनी आतापासून कामाला लागावे : काले जिल्हा परिषद गट, तसेच काले व कालवडे पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवारांनी आतापासून कामाला लागावे, निवडणुकीसाठी सज्ज राहावे. कोणतीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मनोगत : यावेळी कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप आणि कालवडे ग्रामपंचायत सदस्या गीतांजली थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक तडाके यांनी केले, तर आभार बालेशराव थोरात यांनी मानले.