यशवंत कृषी प्रदर्शनात विक्रमी गर्दी; जातिवंत गायी, म्हशी व बैलांच्या मिरवणुकीसह विविध पशुपक्षी, फुलपिके आणि कृषी तंत्रज्ञानाने प्रदर्शन गजबजले
कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या अस्सल ‘दौलतीं’चा उत्सव साजरा झाला. पश्चिम महाराष्ट्रातील जातिवंत गायी, म्हशी व बैलांच्या दिमाखदार मिरवणुकीसह विविध पशुपक्षी, फुलपिके आणि कृषी तंत्रज्ञानाने प्रदर्शन गजबजून गेले.

विक्रमी गर्दी : रविवार सुट्टीचा दिवस असल्याने लाखो नागरिक, शेतकरी व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देत विक्रमी उपस्थिती नोंदवली. या स्पर्धेत खातगुण (ता. कडेगाव) येथील दत्तात्रय प्रभाकर जाधव यांच्या खिलार बैलाने ‘चॅम्पियन ऑफ द शो’चा मान पटकावला.
प्रमुख आकर्षणे : गाय, म्हैस, बैल प्रदर्शनात सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांतील पशुपालकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रंगीबेरंगी विदेशी पोपट, दुर्मीळ पशुपक्षी आणि सुगंधी फुलपिक स्पर्धा ही प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे ठरली.
उद्घाटन व बक्षीस वितरण : सकाळी उपसभापती नितीन ढापरे यांच्या हस्ते, सभापती सतीश इंगवले, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. जनावरांचे संगोपन, चारापाणी, औषधोपचार व उत्पन्नाबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली. सायंकाळी युवा नेते आदिराज पाटील यांच्या हस्ते बाजार समितीचे पदाधिकारी, कोयना दूध संघाचे पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
चॅम्पियन व प्रमुख विजेते
चॅम्पियन ऑफ द शो / चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन : दत्तात्रय प्रभाकर जाधव – खिलार बैल (खातगुण), विविध गटांमध्ये खिलार खोंड, खिलार गाय, कालवड, देशी गोवंश, होस्टन, जर्सी, संकरित गट, म्हैस व रेडा प्रकारांत प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रुपये 2000, 1500 व 1000 रोख बक्षिसे, शिल्ड व प्रमाणपत्र.

दुर्मीळ ‘पुंगनूर’ गाय ठरली आकर्षण
बेलवडे बुद्रुक (ता. कराड) येथील सर्जेराव शामराव मोहिते यांची अडीच फूट उंचीची दुर्मीळ ‘पुंगनूर’ गाय नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिरुपती बालाजी देवस्थानात वापरले जाणारे दूध, दही व तूप यासाठी ही जात प्रसिद्ध आहे. दूध उत्पादन : दररोज ३ ते ५ लिटर दूध दर : रुपये ३०० ते ५०० प्रतिलिटर तूप दर : ५ ते १० हजार प्रतिकिलो अंदाजे किंमत : १ ते २५ लाख रुपये.
बुटके बोकड व विदेशी पक्ष्यांची रेलचेल
बुटके बोकड, दूध देणाऱ्या शेळ्या, पर्शियन मांजर, फायटर असील कोंबडा, ससे, कबुतरे तसेच विविध रंगीबेरंगी विदेशी पोपट व आफ्रिकन बर्ड्स आकर्षण ठरत आहेत. कागल येथील हैदरअली बर्ड ब्रिडिंग फार्मच्या माध्यमातून हे पशुपक्षी सादर करण्यात आले आहेत.

१२ किलोचा टर्की कोंबडा चर्चेत
मिरज तालुक्यातील करोली येथील स्वराज ऍग्रो फार्मच्या स्टॉलवर तब्बल १२ किलो वजनाचा टर्की कोंबडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय कडकनाथ, गिरीराज, सोनाली, कावेरी, ब्लॅक अस्ट्रोलॉपसह विविध जातींच्या कोंबड्या प्रदर्शनात दाखल.











