पृथ्वीराज चव्हाण ठाम; फाईलमधील भारतीयांची नावे आज उघड होण्याची शक्यता
कराड/प्रतिनिधी : –
मी काही हवेत बोललो नाही किंवा अफवा पसरवलेल्या नाहीत. अमेरिकेत सुरू असलेल्या घडामोडी, तेथील नामांकित वर्तमानपत्रांमधील वृत्तांकन आणि अमेरिकन संसदेच्या निकालाच्या आधारेच मी एपिस्टिन फाईलबाबत वक्तव्य केले होते, असे स्पष्ट करत माजी केंद्रीय संसदीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपिस्टिन फाईल प्रकरणावर मोठा गौप्यस्फोट केला.
संपूर्ण माहिती जाहीर करणे बंधनकारक : अमेरिका आणि भारतामध्ये सुमारे १२ तासांच्या वेळेचे अंतर आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार १९ तारखेला संपूर्ण एपिस्टिन फाईलची माहिती जाहीर करणे बंधनकारक असल्याचे सांगत श्री. चव्हाण म्हणाले, भारतात ती माहिती २० तारखेला समोर येण्याची दाट शक्यता आहे. या फाईलमध्ये भारतातील काही प्रमुख आणि प्रभावी मंडळींची नावे असतील, तर त्याचा थेट परिणाम भारताच्या राजकारणावर होईल, या वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचे सांगितले.
माध्यमांशी संवाद : अमेरिकेतील एपिस्टिन फाईल प्रकरणाबाबत माध्यमांशी संवाद साधताना कराड येथे ते बोलत होते.
माझ्यावर टीका केली : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सुमारे १५ दिवसांपूर्वी मी या विषयावर जाहीर वक्तव्य केले होते. अमेरिकेतील घडामोडी तेथील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या होत्या, तसेच अमेरिकन संसदेच्या निकालावर आधारित माझे विधान होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी माझ्यावर टीका केली. ‘यांचे डोके फिरले आहे का?’, ‘यांना म्हातारचळ लागली आहे का?’ अशा शब्दांत माझ्यावर टीका केली गेली. मात्र, राजकारणात आपण राजकीय विश्लेषण करत असतो. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. भारतातील काही प्रमुख मंडळींची नावे त्या फाईलमध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली होती, इतकेच.
माझ्या माहितीत काहीही चुकीचे नव्हते : सध्या एपिस्टिन फाईलबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. सध्या अमेरिकेत पहाटेचे सुमारे चार वाजले असतील. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत अधिकृत बातम्या येण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत सुमारे सात ते आठ तासांचा अवधी आहे. जोपर्यंत ठोस आणि अधिकृत माहिती समोर येत नाही, तोपर्यंत मी यावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, मी दिलेली माहिती महत्त्वाची असून, त्यात काहीही चुकीचे नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी काहीही हवेत बोललो नाही
अमेरिकेतील वर्तमानपत्रांचे वृत्तांकन आणि तेथील संसदेतील कारवाई वाचूनच मी वक्तव्य केले होते. मी काही ‘कुरबुड्या जोशी’ नाही, अशा ठाम शब्दांत सांगत चव्हाण यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
भारताच्या राजकारणावर परिणाम अटळ?
अमेरिकेच्या कायद्यामुळे १९ तारखेला एपिस्टिन फाईल जाहीर होणे, अटळ आहे. त्या फाईलमध्ये भारतातील काही प्रमुख नावे समोर आली, तर त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर निश्चितच होईल, या विधानावर आपण ठाम असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितले.