क्रांतीअग्रणी स्व.डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कुंडल येथे आयोजित क्रांतीअग्रणी व्याख्यानमाला 2025 च्या तिसऱ्या पुष्पाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
व्याख्यानमाला : व्याख्यानमालेच्या या सत्रात ‘आमचा गाव – आमचा विकास’ या विषयावर पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे – पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) होते.
प्रेरणादायी मार्गदर्शन : आपल्या प्रभावी भाषणात पेरे – पाटील म्हणाले, क्रांतीअग्रणी बापू लाड यांच्यासारख्या विचारवंतांची समाजाला आज अधिक गरज आहे. त्यांच्या विचारांचे समाजात रुजणं म्हणजेच खरी क्रांती. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत राबविता येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी स्वच्छ आणि सुंदर गाव उभारण्यासाठी अनेक उपक्रमांची उदाहरणे उपस्थितांसमोर मांडली. शासनाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विकासकामे प्रभावीपणे कशी राबविता येतात, याबाबत त्यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कारखाना वटवृक्षासारखा बहरला : याप्रसंगी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, डॉ.जी.डी. बापू लाड यांनी कुंडल आणि पलूस भागात विकासाची पायाभरणी केली. सहकार चळवळ उभी करत गोर-गरीबांना आधार दिला, तरुणांसाठी रोजगाराची निर्मिती केली आणि अनेक कुटुंबांना आर्थिक सक्षमतेकडे नेले. त्यांनी दूरदृष्टीने उभा केलेला क्रांती कारखाना आज वटवृक्षासारखा बहरला आहे. बापूंच्या सहकार आणि विकासाच्या कार्याचा वारसा आज आमदार अरुण अण्णा लाड, उद्योजक उदय लाड, किरणतात्या, शरद लाड यांनी जपला आहे.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी आमदार अरुण अण्णा लाड, एमपीएससी बँकेचे चेअरमन बाळासाहेब पवार, ज्येष्ठ उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, धनश्रीताई लाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.