२६ ते ३० डिसेंबरदरम्यान यशवंत कृषी प्रदर्शन; १०० मोफत स्टॉलची सुविधा
कराड/प्रतिनिधी : –
दिवंगत यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात यावर्षी शेतकऱ्यांना ‘एआय टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेती’ बाबत अत्याधुनिक माहिती आणि मार्गदर्शनाची पर्वणी मिळणार असून, हेच यावर्षीच्या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. नगरपालिका निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या प्रदर्शनाच्या तयारीला कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गती देण्यात आली असल्याची माहिती समितीचे सभापती शंकरराव इंगवले यांनी दिली.
पत्रकार परिषद : या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी बाजार समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उपसभापती नितीन ढापरे, माजी सभापती, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, गणपत पाटील, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव गुरव, सचिव आबासो आदी उपस्थित होते.
तयारी जलदगतीने : या प्रदर्शनाबाबत सविस्तर माहिती देताना उपसभापती नितीन ढापरे म्हणाले, साताऱ्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत प्रदर्शन भरवण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. केवळ १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने तयारी जलदगतीने करण्यात येत आहे.
बारा शेतकऱ्यांसह उत्कृष्ट गुळ उत्पादकाचा होणार गौरव : यंदाच्या प्रदर्शनात कराड दक्षिणेतील सहा आणि कराड उत्तरेतील सहा अशा एकूण १२ प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती ही गुळासाठी प्रसिद्ध असल्याने यावर्षीपासून उत्कृष्ट गुळ उत्पादक शेतकऱ्यांचाही पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शासनाच्या विविध विभागांचा सहभाग : बाजार समितीच्या आवारात दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरवले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, नव्या शेती पद्धती, पशुपालन क्षेत्रातील माहिती, तरुण शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप मॉडेल्स अशा विविध विभागांचा यात समावेश असणार आहे.
१०० मोफत स्टॉल : या प्रदर्शनात शेतकऱ्यांसह बचत गटांसाठी यंदाही १०० मोफत स्टॉल उपलब्ध केले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करण्याचे नियोजन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, उद्योग-व्यवसायातील विविध घटक यांनी या प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी समितीकडून करण्यात आले.










