कराडमध्ये 26 ते 30 डिसेंबरदरम्यान यशवंत कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

आधुनिक शेती तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना मोठी मेजवानी – जिल्हाधिकारी संतोष पाटील

कराड/प्रतिनिधी : – 

शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती पद्धती, नवतंत्रज्ञान आणि संशोधनाची माहिती प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी कराड येथे भव्य यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. या प्रदर्शनासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

जिल्हास्तरीय समितीची बैठक : कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 26 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली.

मान्यवरांची उपस्थिती : बैठकीस आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे, बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, कृषी विभागातील अधिकारी तसेच बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाची साथ आवश्यक : जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, संशोधन, उत्पादन, ब्रॅण्डिंग आणि विक्री या सर्व टप्प्यांवर तंत्रज्ञानाची साथ आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धती आत्मसात केल्यास उत्पादनक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्रदर्शनात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करावी.

सूचना : जिल्हाधिकारी यांनी, सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभारावेत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून द्यावी, अत्याधुनिक शेती अवजारांचे स्टॉल व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे, पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्स, स्वच्छता अशा सुविधा दर्जेदार ठेवाव्यात अशा प्रमुख सूचना केल्या आहेत.

शेतकरी हिताची परंपरा : कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले म्हणाले, माजी सहकार मंत्री लोकनेते विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आकारास आले. शेतकरी हिताची ही परंपरा बाजार समितीमार्फत यावर्षीही अधिक भव्य स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे.

पाच दिवसांची पर्वणी : कराड परिसरातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचे ज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही पाच दिवसांची पर्वणी ठरणार असून, कृषी क्षेत्रातील नव्या संधींचा महत्त्वपूर्ण अभ्यास करण्याची संधी या प्रदर्शनातून उपलब्ध होणार आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!