कराड मर्चंट, महिला मर्चंट सेवक पतसंस्थेचे उद्घाटन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

मर्चंट परिवाराच्या प्रत्येक सेवकांत स्वावलंबनाची जाणीव बळकट – सौ. भारती मिणीयार

कराड/प्रतिनिधी : –

कराड मर्चंट व महिला मर्चंट सेवक पतसंस्थेचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर दि. १ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेचा उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महिला मर्चंटच्या संस्थापिका सौ. भारती मिणीयार यांच्या हस्ते आणि कराड मर्चंटचे चेअरमन माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

समाधान देणारी बाब : याप्रसंगी बोलताना सौ. भारती मिणीयार म्हणाल्या, सेवकांसाठी सेवकांनी उभारलेली ही पतसंस्था समाधान देणारी बाब असून, अशा उपक्रमामुळे सेवकांमध्ये संघटित भावना वाढीस लागते. वेळेचे नियोजन, सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि व्यवहारातील बचतीचे महत्व अशा संस्थांच्या माध्यमातून अधिक दृढ होते. सेवक एकजुटीने काम करू लागतात आणि प्रत्येक सेवकांत स्वावलंबनाची जाणीव बळकट होते, असे त्यांनी सांगितले.

सेवकांच्या प्रगतीतील मानबिंदू : अध्यक्षीय भाषणात मर्चंट समूहाच्या परंपरेचा उल्लेख करताना माणिकराव पाटील म्हणाले, संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांनी ज्या ज्या नवनवीन संकल्पना राबविल्या आहेत, त्यामध्ये भविष्याचा अचुक वेध घेण्याची संकल्पना असते. त्यांनी आजपर्यंत सेवकांच्या हिताचे घेतलेले निर्णय हे सेवकांच्या प्रगतीतील मानबिंदू ठरले आहेत.

मर्चंट परिवाराचा विस्तार वाढला : संस्थेचे संस्थापक सत्यनारायण मिणीयार यांनी, मर्चंट परिवार हा कराड मर्चंट, महिला मर्चंट, मर्चंट, स्वयंरोजगार, मर्चंट प्रतिष्ठान, सुजीवन योगोपचार केंद्र या संस्थांनी मिळून तयार झालेला परिवार असून, या परिवारामध्ये सेवक पतसंस्थेच्या रुपाने नवीन संस्थेची भर पडल्याने मर्चंट परिवाराचा विस्तार वाढला आहे. या सर्व संस्था उत्तम रितीने काम करीत असून, दिर्घकालापासून समाजाची सेवा करत आहेत. सेवक पतसंस्थेत सर्वसेवकांनी उत्तम काम करुन संस्था चांगली नावारुपास आणावी, अशी आपेक्षा व्यक्त केली.

पहिली सर्वसाधारण सभा : उपनिबंधक सहकारी संस्था, कराड येथील अधिकारी तानाजी देशमुख यांच्या उपस्थितीत संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

चेअरमनपदी राजाराम मोहिते यांची निवड : कराड मर्चंट व महिला मर्चंट सेवक संस्थेच्या चेअरमनपदी कराड मर्चंटचे राजाराम मोहिते, तर व्हा. चेअरमनपदी महिला मर्चंटचे अनिल कदम यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळ : संस्थेचे संचालक म्हणून सुनिल जाधव, शरद पाटील, रफीक सय्यद, प्रमोद खोलपे, राजकुमार देशमुख, रामचंद्र पवार, दिलीप पाटील, अंजली बाकळे, विश्वास पाटील, धनाजी जाधव, सुनिता सुर्यवंशी, प्रियांका कारंडे, माधवी पाटील यांची निवड झाली. सचिवपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

संकल्प : नवनिर्वाचित संचालकांनी सर्व सभासदांचे आभार मानले आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. कराड मर्चंट समूहाच्या सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांमध्ये आणखी एक अर्थपूर्ण भर पडल्याने सेवकवर्गात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!