सेवानिवृत्त सुभेदार धनंजय यादव यांचे कराड मध्ये जल्लोषात स्वागत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

28 वर्षांच्या उज्वल सेवेनंतर आपल्या जन्मभूमीत वीर सैनिकाचा सत्कार

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय सैन्यात तब्बल 28 वर्षे अविरत आणि उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सुभेदार धनंजय ज्ञानदेव यादव यांचे कराड शहरात भव्य स्वागत करण्यात आले. कोर ऑफ सिग्नल्स रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना त्यांनी जम्मू – कश्मीर, आसाम, अरुणाचल प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा विविध दुर्गम आणि धोकादायक सीमावर्ती भागांत देशसेवा बजावली.

युद्धात सहभागी होण्याचा सन्मान : 1997 साली भारतीय लष्करात दाखल झालेल्या धनंजय यादव यांना 1999 मधील कारगिल युद्धात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. ‘ऑपरेशन विजय’सह अनेक महत्त्वपूर्ण युद्धसरावांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. सेवाकाळाच्या शेवटी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही त्यांचा सहभाग राहिला. आपल्या शिस्तबद्ध कामगिरीने त्यांनी अनेक जवानांना मार्गदर्शन करत आदर्श निर्माण केला. 30 नोव्हेंबर 2025 रोजी ते मानमरातबाने सेवानिवृत्त झाले.

शिक्षण : रविवार पेठ, कराड येथे वास्तव्यास असलेले आणि मूळचे चोरे (उंब्रज), ता. कराड येथील असलेल्या यादव यांचे प्राथमिक शिक्षण कराड नगरपालिका शाळा क्र. 2 मध्ये, तर पुढील शिक्षण श्री शिवाजी विद्यालय, वेणुताई चव्हाण कॉलेज, तसेच स.गा.म. कॉलेज येथे पूर्ण झाले.

सत्कार : सेवानिवृत्ती निमित्त श्री सोमेश्वर मंदिर येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात शाल, श्रीफळ, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, महिलांकडून औक्षण, पेढे वाटप आणि केक कापून त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती : या स्वागत सोहळ्यास माजी नगरसेवक नाना घोडके, उद्योजक नामदेव थोरात, पोपटराव साळुंखे, दत्तात्रय चव्हाण, शेखर बर्गे, सागर बर्गे, बापू करपे, गौतम करपे, सन्नी घोडके, तसेच सोमेश्वर शिवाजी गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ, अल्हाद गणेश मंडळ, गजानन नाट्य मंडळ, समता गणेश मंडळ, त्रिमूर्ती गणेश मंडळ आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

लवकरच भव्य सत्कार समारंभ : शहरातील विविध मंडळांच्या वतीने, तसेच लष्करी सेवेतून जोडलेल्या त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सुभेदार धनंजय यादव यांचा भव्य सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!