मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कराड-मलकापूरला झोपडपट्टीमुक्त करून विकासाचा नवा अध्याय
कराड/प्रतिनिधी : –
अतुलबाबा भोसले हे विकासाचे स्पष्ट व्हिजन असलेले, मोठी स्वप्ने पाहणारे आणि ती पूर्ण करण्याची क्षमता असलेले युवा नेते आहेत. त्यामुळेच त्यांना रोखण्यासाठी काही मोठे नेते त्यांच्याभोवती षडयंत्र रचत आहेत. पण अतुलबाबा आधुनिक अभिमन्यू आहेत, हा चक्रव्यूह ते भेदणारच. मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अतुलबाबा कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
जाहीर प्रचार सभा : शिवतीर्थ दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या कराड व मलकापूर नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : सभेस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, नीता केळकर, भरत पाटील, विक्रम पावसकर, सुहास जगताप, रामकृष्ण वेताळ, अध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर व तेजस सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

… त्यांनी आशीर्वाद द्यायला हवे होते : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तरुण नेतृत्वाला आशीर्वाद द्यायला हवे होते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्याऐवजी त्यांच्यासह काही नेते अतुलबाबांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
विकासकामांसाठी मोठा निधी : केंद्र व राज्य शासनाकडून विकासकामांसाठी मोठा निधी देणार दिल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कराडमधील ११ आणि मलकापुरातील ३ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून दोन्ही शहरांना झोपडपट्टीमुक्त करू. अतुलबाबांच्या स्वप्नातील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळाचे रिडेव्हलपमेंट प्राधान्याने पूर्ण करू. अत्याधुनिक शिवाजी स्टेडियमसाठी ९६ कोटी, खाशाबा जाधव स्मारकासाठी २५ कोटी, कराड–विटा महामार्ग, रस्ते, लिंक रोड, आंबेडकर वाचनालय, पाणीपुरवठा योजना यांसह ४०० कोटींची कामे मार्गी लावली आहेत.
आदर्श शहरं बनवू : कराड ही छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची भूमी आहे. दोन्ही ठिकाणी सत्ता द्या, कराड व मलकापूरला आदर्श शहरांचा नमुना करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.












