मराठा समाजावर अन्याय केला नाही 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

पृथ्वीराज चव्हाण; माजी सहकारमंत्र्यांना ‘हाता’ची ॲलर्जी?, निवडून येण्यासाठीचा घोडेबाजार थांबवा 

कराड/प्रतिनिधी – 

कराड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी खुले आरक्षण आहे. या ठिकाणी काँग्रेसची ताकद कमी असली तरी, हाताच्या चिन्हावर लढायची आमची तयारी होती. मात्र नगराध्यक्ष पदासाठीच्या मराठा समाजातील उमेदवारांवर प्रचंड दबाव आणला गेला. त्यामुळे ऐनवेळी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने निवडणूक लढायची तयारी दर्शवल्याने उमेदवारी दिल्याचे सांगत काँग्रेसने मराठा समाजावर कोणताही अन्याय केला नसल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

जाहीर सभा : येथील विठ्ठल चौकात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती : यावेळी माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते अजितराव पाटील – चिखलीकर, भानुदास माळी, शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील आदी मान्यवरांसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण आणि नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

सहमती आणि पाठिंबाही दिला : श्री. चव्हाण म्हणाले, या निवडणुकीत एक भक्कम आघाडी करण्यासाठी संमती दिली, नगराध्यक्षपदासाठीही पाठिंबा दिला होता. परंतु आमचे लोक स्वाभिमानाने हाताच्या चिन्हावरचं उभे राहतील, ही भूमिका ठामपणे मांडली, मात्र त्यास विरोध झाला. माजी सहकारमंत्र्यांना ‘हाता’ची ॲलर्जी काय आहे, माहिती नाही. परंतु निवडणुकीत एक राष्ट्रीय पक्ष म्हणून हाताच्या चिन्हावर उभे राहणार नसाल; तर मी माघार घेतो, असे सांगितल्यावर पक्षाचे लोक चिन्हावर लढायला तयार झाले. आमची ताकद कमी असल्याने चार – सहा जागांवरही आम्ही समाधान मानणार होतो. मात्र माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हाताच्या चिन्हाला विरोध केला. त्यामुळे नगरसेवक पदासह पंधरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार उभे केल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वधर्म समभावाची भूमिका : काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी झाकीर पठाण यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आपल्या समाजातील एखादा व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा होईल, या असुयेपोटी मुस्लिम समाजबांधवांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत श्री. चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आंबेडकरांचे संविधान आणि सर्वधर्म समभाव ही भूमिका घेतल्याने देशात स्वातंत्र्यानंतर कुठलीही हुकूमशाही चालली नाही. मात्र आज जातीयवादी भूमिकेमुळे विचारधारेची लढाई लढण्याची वेळ आली आहे.

संविधान वाचवण्याचे काम : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे कराड पालिका निवडणुकीत क्रांती झाली तर, संविधान वाचवण्याचे काम आपल्याकडून होईल. अन्यथा सर्वसामान्य जनतेला कोणीही वाली राहणार नाही.

बी टीम असल्याचा प्रोपोगंडा : काँग्रेसचे उमेदवार ही भाजपची बी टीम असल्याचा प्रोपोगंडा पसरवला जात आहे. मताला मोठा दर काढला आहे, हे लोकांचे लुटलेलेच पैसे आहेत. महाराष्ट्रात याआधी एवढे भ्रष्ट सरकार कधी आले नव्हते, अशी टिपण्णी करत कराड नगरपालिका निवडणुकीत आमचे उमेदवार हाताच्या चिन्हावर उभे आहेत; ईव्हीएमवर नाहीत, असा टोलाही त्यांनी भाजप सरकारला लगावला. तसेच कराडला कॉन्ट्रॅक्टरच्या विळख्यातून सोडवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करून क्रांती घडवा, असे आवाहन त्यांनी केले.

मतचोरी झाली : विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली. काँग्रेसची विचारधारा असलेल्या लोकांना भाजपने फितूर केल्याचे सांगत माजी मंत्री नसीम खान म्हणाले, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा पृथ्वीराज चव्हाण चालवत आहेत. आज त्यांच्यासारख्या अपयश येते, हे देशासाठी घातक चित्र आहे. भ्रष्टाचार वाढला असून, निवडून येण्यासाठी होणारा पैशाचा वापर, घोडेबाजार थांबवायचा आहे.

फूट पाडण्याचा प्रयत्न : निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले, ते पैसे मिळाले का? शेतकऱ्यांना भाववाढ, कर्जमाफी मिळाली का? असे सवाल उपस्थित करत या पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, ते आरक्षण लटकवत ठेवले. आज ओबीसी – मराठा, हिंदू – मुस्लिम, भारत – पाकिस्तान, बटोगे तो कटोगे असे सांगून जाती-धर्मात, समाजा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

… हा भाजपचा धंदा : लोकांच्या खिशावर डल्ला मारून निवडणुका जिंकणे, हे हा भाजपचा धंदा आहे, असे सांगत माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले, आज संविधान धोक्यात असून, त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. आमदार, खासदार खरेदी केले जात आहेत, ईडी, सीबीआय, जेल यांची भीती दाखवून हुकूमशाही सुरू आहे. याला नेस्तनाबूत करून भाजपचा अहंकार धुळीस मिळवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या.

लोक विचारांती मतदान करतील : स्वच्छ चरित्राच्या पृथ्वीराज चव्हाण यांना दृष्ट लागली, जातीयवाद त्यांची कोणती केली, अडचणीत आणले. याचा नक्कीच विचार करून लोक मतदान करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रीय पुढं विचार पुढे नेण्यासाठी काँग्रेस विचाराची सत्ता आणा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

मुस्लिम समाज माझ्या पाठीशी : मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र माझा सोबत 100 टक्के माझ्या पाठीशी आहे. आम्ही कधीही भाजपबरोबर जाणार नाही, काँग्रेस आणि काँग्रेसचा विचार जिवंत ठेवू, असे नगराध्यक्ष पदाची उमेदवार झाकीर पठाण यांनी सांगितले.

मनोगत  : अजितराव पाटील – चिखलीकर, माजी नगराध्यक्ष अर्चना पाटील, उमेदवार समीर पटवेगार, अक्षय सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेस चांगला प्रतिसाद मिळाला.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!