मंत्री मकरंद पाटील; समविचारी पुरोगामी विकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
कराड/प्रतिनिधी : –
मलकापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. विरोधक काहीही बोलोत, राज्याचे अर्थखाते आपल्याकडे आहे. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचा पाऊस पडेल. या माध्यमातून शहराच्या विकासाला मोठी गती देऊ, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
जाहीर सभा : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : यावेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर, डॉ. सुधीर जगताप, बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील-वाठारकर, सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, अजित पाटील-चिखलीकर, प्रा. धनाजीराव काटकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. आर्यन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोठी ताकद : ना. पाटील म्हणाले, ही केवळ निवडणूक नाही, तर या भागाचे पुढील अनेक वर्षांचे भविष्य ठरवणारा क्षण आहे. पुरोगामी विकास आघाडीने समाजमन जाणणारे उमेदवार दिले आहेत. उच्चशिक्षित नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ही आमची मोठी ताकद आहे.
पुरोगामी विचाराला साथ द्या : यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, प्रेमिलाताई चव्हाण, विलासराव पाटील – उंडाळकर यांचा उल्लेख करत त्यांनी, इतकी विद्वत्ता असणाऱ्या या मातीत आज कोणती विचारसरणी रुजली आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार आपण सांगतो, पण त्या विचारांपासून दूर गेलो तर, युवा पिढीसमोर काय ठेवणार? असा प्रश्न उपस्थित करत पुरोगामी विचाराला साथ देण्याचे आवाहन केले.
सरंमजाम प्रवृत्तींना थारा देऊ नका : आकर्षक आश्वासने, पैशांची भाषा पुढील काही दिवसांत वाढेल, असे सांगत उदयसिंह पाटील म्हणाले, मलकापूरच्या नागरिकांनी स्वाभिमानाने मतदान करून पुरोगामी विचारांना पाठिंबा द्यावा. कराड दक्षिणमध्ये रुजू पाहणाऱ्या सरंमजाम प्रवृत्तींना थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी मलकापूरकर नागरिक, मतदारांना केले.
पैशाचा उधळपट्टी, सत्तेचा गैरवापर : सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत त्यांनी निवडणुकीचा बाजार मांडला गेला असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांनी, पैशाचा उधळपट्टी आणि सत्ता यांचा उघड गैरवापर सुरू आहे. मतदारांचा अनादर करणाऱ्या प्रवृत्तीला आता आळा घालावा लागेल, असे सांगितले.
पूर्ण क्षमतेने काम करीन : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. आर्यन कांबळे म्हणाले, मलकापूरमध्ये प्रलंबित प्रश्नांची संख्या मोठी आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करीन. पुरोगामी विकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढत आहे आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
विकासाला साथ द्या : मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांवर अन्याय-अत्याचार केल्याचे सांगत शहराचे विकासाला साथ देण्याचे आवाहन दादासो शिंगण यांनी केले.
उपकारकर्त्याला विसरून विरोधकांच्या मांडीवर बसलात!
पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूरसाठी तब्बल १६०० कोटींचा निधी दिला. दोन वेळा तुमच्या घरातील व्यक्तींना आमदार केले आणि ज्यांनी उपकार केले, त्यांच्याच विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसलात. हा उपकाराचा मोबदला आहे का? असा सवाल अजितराव पाटील – चिखलीकर यांनी मनोहर शिंदे यांचा समाचार घेताना उपस्थित केला. तसेच पृथ्वीराज बाबांचा हा अपमान धुवून काढण्यासाठी जनता यथोचित उत्तर देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.