कराड/प्रतिनिधी : – छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, विजय दिवस समारोह समिती, एनव्हायर्नमेंट नेचर क्लब, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहभागातून उद्यानात २६ नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
मार्गदर्शन : कार्यक्रमात सुहास पाटील, प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, डॉ. सुधीर कुंभार, प्रा. भगवान खोत आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संभाजीराव मोहिते यांनी मार्गदर्शन केले.
उद्देशिकेचे वाचन : कार्यक्रमाची सुरुवात सुहास पाटील यांच्या हस्ते उद्देशिकेचे वाचन करून तिचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी, उद्देशपत्रिकेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या घटकांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली.
कर्तव्यपालन अत्यावश्यक : संविधानातील मुलभूत हक्क व कर्तव्यांवर प्रकाश टाकत डॉ. सुधीर कुंभार यांनी, प्रत्येक नागरिकाने कर्तव्यपालन करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी काही महत्त्वाच्या कलमांशी निगडित उदाहरणे देत संविधानाची सांगड सद्यस्थितीशी घातली.
ऐतिहासिक महत्व : भारतीय राज्यघटनेचा इतिहास उलगडताना प्रा. भगवान खोत यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया, २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून का निवडला गेला, यामागचे ऐतिहासिक महत्व स्पष्ट केले. प्रजासत्ताक म्हणजे काय” याचा अर्थ त्यांनी सोप्या उदाहरणांतून सांगितला.
भारत निधर्मी राष्ट्र : नागरिकांची संवैधानिक जबाबदारी अधोरेखित करताना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. संभाजीराव मोहिते यांनी, प्रत्येक घरात राज्यघटनेची प्रत असली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने ती एकदा तरी वाचलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. भारत सर्वधर्मसमभाव मानणारा निधर्मी राष्ट्र असून, प्रत्येकाने धर्माचा आचार-विचार पाळताना इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा येऊ नये, याचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संविधान शपथ : कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सुधीर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक संविधान शपथ देण्यात आली. अभियंता अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले तर मोहन डोळ यांनी आभार मानले.
संविधान मूल्यांची जागृती : उपस्थित सेवाभावी संस्था, मान्यवर व नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे संविधान मूल्यांच्या जागृतीचा हा कार्यक्रम यशस्वी ठरला.