ॲड. संभाजीराव मोहिते; यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम
कराड/प्रतिनिधी : –
मतदान प्रक्रिया ही लोकशाहीची जननी असून, प्रत्येक नागरिकाने निर्भीडपणे, सजगतेने आणि कोणत्याही मोहाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावणे, हे आपले मूलभूत कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ॲड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
मतदार जनजागृती : मलकापूर येथील यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त निवडणूक प्रशासनाच्या स्वीप पथकातर्फे आयोजित मतदार जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती : याप्रसंगी स्वीप पथक प्रमुख प्रतिभा लोंढे, सहाय्यक प्रमुख महेंद्र भोसले, ज्ञानदेव साळुंखे, अभिजीत ढाणे, शाहीन मणेर, गोविंद पवार, प्रदीप बंडगर, प्रथमेश देवकुळे आदी उपस्थित होते.
सक्षम लोकशाहीची पायाभरणी : ॲड. मोहिते म्हणाले, जात, धर्म, पंथ यांचे संकुचित विचार बाजूला ठेवून, कोणत्याही तात्काळ लाभाच्या प्रलोभनात न अडकता ससद्विवेकबुद्धीने मतदान करणे आवश्यक आहे. सुजाण मतदारच सक्षम लोकशाहीची पायाभरणी करतात.
मतदारांना शपथ : कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा लोंढे यांनी, महेंद्र भोसले यांनी आभार मानले. उपस्थित मतदारांना शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आयोजन : या उपक्रमाचे आयोजन मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, सहाय्यक निर्णय अधिकारी कपिल जगताप व ज्ञानदेव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.