धारेश्वर यात्रा महोत्सव भक्तिभावात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

कराड/प्रतिनिधी : –

पाटण तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान, धारेश्वर येथे यंदाचा वार्षिक यात्रा महोत्सव अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. दरमहा होणाऱ्या अभिषेक-बिल्वार्चन, तसेच महामंगलारतीने महोत्सवाचा शुभारंभ झाला.

पुष्पवृष्टी : शुक्रवारी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सूर्योदयाच्या वेळी श्री वीरभद्र जन्मोत्सव पुष्पवृष्टीने साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्व देवांची रुद्राभिषेक, बिल्वार्चन व महामंगलारती भाविकांच्या मोठ्या गर्दीत पार पडली. दिवसभर भाविकांनी अभिषेक व बिल्वार्चनाचा लाभ घेतला.

विशेष कौतुक : पाटणचे शिवाजी आप्पा जाधव बंधू व मित्रमंडळी यांनी आकर्षक फुलसजावट केली. उंडाळेकर नानांनी दिलेल्या प्लास्टिक फुलमाळा व आकाशकंदीलांच्या सहाय्याने वीरमाहेश्वर जंगम तरुण पुरोहित यांनी मंदीराची देखणी सजावट केल्याचे विशेष कौतुक झाले.

पालखी-छबिना सोहळा : यंदा सार्वजनिक स्वच्छतागृहापासून गुफेजवळील देवीच्या मंदिरापर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असल्याने पालखी-छबिना सोहळा पायीच काढण्यात आला. तरीही नाचत-गात, हर्षोल्हासात भक्तांच्या गर्दीत हा सोहळा मोठ्या वैभवात संपन्न झाला.

यशस्वी आयोजन : वाहनबंदीमुळे किरकोळ वाद झाले असले तरी, मठाधीकारी, मानकरी व पुजारी यांच्या सूचनांचे पालन केल्याने कोणताही अडथळा न येता यात्रेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.

अभिषेक व बिल्वार्चनासाठी गर्दी : शनिवारी दिवसभर दर्शन, अभिषेक व बिल्वार्चनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवारी कैलास तृतीया निमित्त गुरुभंडारा, अय्याचीरोटी–चटणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व देवांचे रुद्राभिषेक, बिल्वार्चन, महामंगलारती, तसेच वार्षिक श्रीफळ नैवेद्य समर्पण करण्यात आले.

पूजा-अर्चा : राष्ट्रसंत सद्गुरू धारेश्वर महाराज यांच्या सान्निध्यात पुजारी शास्त्री व सेवाधारी जंगम पुरोहितांनी पंचामृत, उष्णोदक, शुद्धोदक, भस्मगंध, बेलफुले, पंचारती, धूपारती, वेगवेगळे नैवेद्य अर्पण करून पूजा-अर्चा केली.

महाप्रसाद : रात्री उशिरा ९ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसाद वाटप चालू होते. या यशस्वी आयोजनाबद्दल मठाचे आचारी ए. एस. पाटील जंगम, हिशोबनीस लकडे काका, परमरहस्य पारायण मंडळ सदस्य मेजर सूर्यवंशी, तसेच यात्रा व अभिषेक-बिल्वार्चन समितीचे उपाध्यक्ष व्यंकट कचरे यांनी माहिती दिली.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!