कराडच्या सर्वांगीण विकासासाठी समविचारींची साथ

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

बाळासाहेब पाटील; मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य – राजेंद्रसिंह यादव

कराड/प्रतिनिधी : –

कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीने तीस जागांवर उमेदवार उतरवले असून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा ठोस मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अर्ज माघारी घेऊन सहकार्याची भूमिका घेतली आहे. आणखीही समविचारी आपणास साथ देणार असून, या निवडणुकीत मोठे यश नक्की मिळेल, असा ठाम विश्वास माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

संयुक्त पत्रकार परिषद : सोमवार पेठेतील सारडा लॉन येथे लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव, माजी उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, ज्येष्ठ नेते जयंतकाका पाटील, सुभाषकाका पाटील, माजी नगरसेवक अल्ताफ शिकलगार, फारूक पटवेकर, घनश्याम पेंढारकर, नितीन वास्के यांच्यासह आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

समविचारींसह लढण्याचा निर्णय : बाळासाहेब पाटील म्हणाले, राष्ट्रवादी-काँग्रेस-यशवंत विकास आघाडी अशी भक्कम मोट बांधण्याचा माझा सुरुवातीपासून प्रयत्न होता. त्यास सर्वांची अनुकूलताही होती. पण काहींनी जागावाटपात अवाजवी मागण्या केल्याने परिस्थिती बदलली. त्यामुळे लोकशाही आघाडी, यशवंत विकास आघाडी आणि इतर समविचारींसह लढण्याचा निर्णय घेतला. गेली नऊ वर्षे पालिकेची निवडणूक न नसल्याने इच्छुकांची संख्या वाढली होती. अनेकांची समजूत काढत सर्व जाती-धर्मातील नागरिकांना प्रतिनिधित्व मिळेल, याची काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

43 वर्षे विकास अनुभवला : ते म्हणाले, या शहराने 43 वर्षे सलग एकाच घराण्याच्या नेतृत्वाखाली विकास अनुभवला. पाणीपुरवठा, सांडपाणी योजना, रस्ते, शाळा, नगरपालिका इमारत, शिवाजी स्टेडियम, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, समाधी व बाग परिसर अशा अनेक कामांचा इतिहास आहे. आजही त्याच विचारांच्या परंपरेला अनुसरून आम्ही एकत्र लढत असून, शहरातील पार्किंग व वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आधुनिक सुविधा असे प्रश्न जाहीरनाम्यात प्राधान्याने समाविष्ट करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एका प्रभागात उमेदवार नसला तरी, 30 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी आघाडीची तयारी भक्कम असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रचारात आक्रमकता ठेवावी, पण पातळी सांभाळावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कराडची अस्मिता जपण्यासाठी निवडणूक : उमेदवार राजेंद्रसिंह यादव म्हणाले, विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कराड शहरातील मूलभूत नागरी सुविधांचे जाळे सक्षम करणे, ही आमची प्राथमिकता असेल. पुढील पन्नास वर्षांचा दृष्टीकोन ठेवून शहराच्या उन्नतीसाठी काम करू. कराडची अस्मिता जपण्याचे ही निवडणूक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सायंकाळी दत्त चौक-शिवतीर्थ परिसरातून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिन्हाचा प्रश्न कधीच आला नाही

पूर्वीच्या दोन निवडणुकांत कराडमध्ये आघाडी सुरळीतरित्या चालली होती, चिन्हाचा प्रश्न कधीच आला नाही. या निवडणुकीतही आघाडी ठेवण्याची आमची इच्छा होती. पण काहींच्या आग्रहामुळे ते शक्य झाले नाही. तरीही समविचारींच्या पाठबळावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत. पी. डी. पाटील घराण्याचा उमेदवार या निवडणुकीत थेट नसल्याबाबत लोक भावना व्यक्त करत आहेत, मतदानातून त्या दिसतीलही. पण आम्ही माघार घेतलेली नसून, नव्या चेहऱ्याला संधी देत शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वांसोबत उभे असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

आशीर्वाद घेतले, निर्णय लोक ठरवतील  

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या तब्येत विचारून करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत. राजकीय चर्चा सुरूच आहे. गावाच्या विकासासाठी साथ देणाऱ्यांना आम्ही सोबत घेणार आहोत. कॉंग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात असला तरी, विकासाचा दृष्टीकोन ठेवून कोणाला पसंती द्यायची, हे लोक ठरवतील, असे मत माध्यमांच्या प्रश्नांवर बोलताना राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केले.

अन्यायकारक निवड प्रक्रियेवर रोष

आमचा भारतीय जनता पार्टीला विरोध नाही. पण उमेदवारी वाटपात झालेल्या अन्यायकारक प्रक्रियेबद्दल रोष आहे. पक्षाच्या आदेशानुसार आम्ही दीड वर्षांत पदाचा राजीनामा दिला; वर्षानुवर्षे निष्ठेने काम केले. तरीही आम्हाला डावलण्यात आले. म्हणूनच या चुकीच्या निवड प्रक्रियेविरोधात वेगळी भूमिका घेणे भाग पडले, अशा शब्दात आघाडीसोबत जाण्याची भूमिका भाजपचे माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर यांनी एका प्रश्नावर बोलताना स्पष्ट केली. 

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

आणखी वाचा

Buzz4 Ai
error: Content is protected !!