मलकापुरात समविचाऱ्यांच्या मदतीने विजय मिळवू 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

उदयसिंह पाटील; नगराध्यक्षपदासह सोळा उमेदवार रिंगणात 

कराड/प्रतिनिधी : – 

मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेवटच्या क्षणी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत, त्यामुळे अपेक्षित आघाडी साधता आली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्षपदासह 16 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले असून, या निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन विजय मिळवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपताच राष्ट्रवादीने अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केले. यावेळी रयत संघटनेचे प्रा. शरद काटकर, राजेश पाटील- वाठारकर, काँग्रेसचे अजितराव पाटील – चिखलीकर, इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील, पाटणचे राजेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

नाराज का झाले, हा संशोधनाचा विषय : समविचारी व नाराज कार्यकर्त्यांना घेऊन नवे राजकीय समीकरण उभे करण्याच्या टीकेवर उत्तर देताना उंडाळकर म्हणाले, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यांनी टीका केली, त्यांच्याच सोबत असलेले लोक नाराज का झाले, हा संशोधनाचा विषय आहे. काँग्रेससोबत आघाडी न झाल्याने काही ठिकाणी उमेदवार मिळवणे कठीण गेले, मात्र मलकापूरच्या विकासासाठी सक्षम व उमद्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने पुढाकार घेतला : भाजपविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. त्याला काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच इतर समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शिव, शाहू, आंबेडकर विचार मानणाऱ्यांनाच आम्ही सोबत घेतले आहे, असे उंडाळकर यांनी सांगितले. नाराज लोकांना साथ दिली असली तरी, त्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

…म्हणून त्या जागा बिनविरोध : मलकापूरात भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबाबत ते म्हणाले, त्या जागांवर इतर कोणत्याही पक्षाकडून उमेदवार उभे राहिले नाहीत, म्हणून त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने आणखी एक जागा बिनविरोध झाली. इतर पक्षांना नगराध्यक्ष पदासाठी सोबत घेणार का, या प्रश्नावर याबाबत चर्चा सुरू असल्याचे उंडाळकर यांनी सांगितले.

काँग्रेसने काय कमी केले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पाटील-चिखलीकर यांनी मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर तीव्र टीका केली. त्यांचे नाव न घेता चिखलीकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबाला मोठे स्थान दिले. त्यांच्या वडिलांना दोन वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली. तरीही त्यांना कोणती अडचण निर्माण झाली की, त्यांनी पक्ष सोडावा लागला? लोकसभा निवडणुकीनंतरपासून त्यांची हालचाल सुरू होती. याबाबतची कल्पना पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेला काँग्रेसचे काम केलेच नाही : विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी काम केले नाही, हे वास्तव आहे. मलकापुरात चार हजार मते कशी कमी पडली, याचे उत्तर त्यांनी द्यावे. यावेळी संक्रमणकाळ असला तरी आम्ही निष्ठावंत आहोत, कोणाच्याही वळचणीला जाणार नाही, असेही चिखलीकर यांनी नमूद केले.

घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपद व 16 उमेदवार : तत्पूर्वी, राजेश देसाई यांनी, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी आर्यन कांबळे यांच्यासह नगरसेवकपदासाठी 16 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. समविचारी लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Jan Swarashtra
Author: Jan Swarashtra

error: Content is protected !!